कुर्डूवाडी ते ढालगाव, दुधनी ते सावळगी, मोहोळ-कुर्डूवाडी मार्गावर धावली विजेवरील रेल्वे
By Appasaheb.patil | Published: March 5, 2021 12:05 PM2021-03-05T12:05:17+5:302021-03-05T12:10:25+5:30
प्रवास होणार सुपरफास्ट : मोहोळ-कुर्डूवाडीपर्यंतचीही झाली चाचणी यशस्वी
लोकमतचा प्रभाव
सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील कुर्डूवाडी ते ढालगाव, दुधनी ते सावळगी अन् मोहोळ ते कुर्डूवाडीपर्यंत झालेल्या विद्युतीकरणाच्या कामानंतर गुरुवारी मध्य रेल्वेच्या कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस) पथकाने अंतिम चाचणी करून यशस्वी अहवाल दिला. यावेळी या तीनही टप्प्यात विजेवरील रेल्वेगाडी वेगात धावली.
मिरज ते लातूर या रेल्वेमार्गावरील मिरज ते कुर्डूवाडीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले होते. मात्र, अंतिम चाचणी (सीआरएस)च्या पथकाची चाचणी प्रलंबित होती, त्याबाबत ‘लोकमत’ने १ मार्च रोजी याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत सीआरएसचे पथक गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी प्रलंबित तिन्ही मार्गाची अंतिम चाचणी करून यशस्वी कामाचा अहवाल दिला. मिरज-ढालगावपर्यंतचे ६३ किलोमीटरचे काम ६ जानेवारी २०२० रोजी पूर्ण झाले होते, ढालगाव ते सांगोला (४४.९ कि.मी.), सांगोला ते पंढरपूर (२९.४ कि.मी.) व पंढरपूर ते कुर्डूवाडीपर्यंत काम मार्च २०२० मध्ये पूर्ण झाले होते. मात्र, सीआरएसच्या चाचणीअभावी या मार्गावर विजेवरील रेल्वे अद्याप धावली नव्हती, गुरुवारी विजेवरील रेल्वे धावली अन् यशस्वी अहवाल मिळाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
या अधिकाऱ्यांनी केली पाहणी...
मध्य रेल्वेच्या मिरज -ढालगाव-कुर्डूवाडी-मोहोळ व दुधनी ते सावळगीपर्यंतच्या विद्युतीकरणाची पाहणी झाली. ही पाहणी मध्य रेल्वेच्या कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टी (सीआरएस)चे प्रमुख विजय बडाेले, आरव्हीएनएलचे संयुक्त सहाय्यक व्यवस्थापक ग्यानेंद्र सिंग, मध्य रेल्वेचे यातायात प्रमुख संजीव अर्धापुरे यांनी पाहणी करून आगामी काळात या तिन्ही टप्प्यातील मार्गावरून विजेवरील गाड्या चालविल्या जाण्यास कोणत्याही प्रकारची अडचण नसल्याचा अहवाल दिल्याचे सांगण्यात आले.