लोकमतच्या वृत्तानंतर कुर्डूवाडी पंचायत समिती फुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:14+5:302021-06-17T04:16:14+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सोलापूर शहर वगळता ग्रामीण भागातील सर्व शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थितीबाबत आदेश दिला होता. जिल्हा ...
जिल्हाधिकाऱ्यांनी ७ जून रोजी सोलापूर शहर वगळता ग्रामीण भागातील सर्व शासकीय कार्यालयात ५० टक्के उपस्थितीबाबत आदेश दिला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे याबाबत कोणतेही लेखी आदेश नसल्याचे कारण पुढे करीत कर्मचारी गैरहजर राहत होते. त्यामुळे येथील अनेक कार्यालये ही उघडी पण मोकळी होती. याबाबत ‘सही मस्टरवरी अन् साहेब मात्र घरी’ असे वृत्त लोकमतने बुधवारी प्रसिद्ध करताच याची दखल जिल्हा परिषद व कुर्डूवाडी पंचायत समिती प्रशासनाकडून घेण्यात आली. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी कार्यालयात सकाळी आल्याबरोबर सर्व कार्यालयांची पाहणी करुन दैनंदिन उपस्थितीबाबत सूचना दिल्या. यावेळी त्यांना सर्वजण उपस्थित असल्याचे दिसून आले.
मात्र बदली होऊन आल्यानंतर गेल्या दोन वर्षात कधीही येथील विविध विभागाच्या कार्यालयात न फिरकलेली मंडळी बीडीओ अचानकपणे तपासणी करीत आल्याने अनेकांची धावपळ उडाली. यादरम्यान त्यांनी आम्ही फिल्डवर होतो अशी उत्तरे त्यांना दिली.
एकंदरीतच सोमवारी व मंगळवारी १० टक्के उपस्थिती असलेले येथील सर्व कार्यालये बुधवारी मात्र हाऊसफुल्ल झालेली दिसून आली. येथील कृषी, ग्रामपंचायत, प्रशासन, अर्थ, पशुसंवर्धन, बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा, जलसंधारण, आरोग्य, महिला बाल कल्याण, समाजकल्याण, ग्रामीण रोजगार हमी योजना या सर्व विभागांची कार्यालये बुधवारी दिवसभर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भरलेली दिसून आली.
----
मी स्वतः बुधवारी सकाळी पंचायत समिती कार्यालयात गेल्यानंतर सर्वप्रथम सर्व विभाग प्रमुखांच्या कार्यालयात जाऊन तेथील कर्मचारी व अधिकारी ५० टक्के उपस्थित राहतात की नाही याबाबत खातरजमा केली. आदेशानुसार ५० टक्के सर्वांनी उपस्थिती लावावी अशा सूचनाही सर्वांना केल्या आहेत.
- डॉ. संताजी पाटील, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, कुर्डूवाडी.
----------