कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजनयुक्त ३० बेडची सोय होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:23 AM2021-05-26T04:23:05+5:302021-05-26T04:23:05+5:30
कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनयुक्त बेडचे सेंटर बनले, तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा त्रास होणार नाही. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या ...
कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालय ऑक्सिजनयुक्त बेडचे सेंटर बनले, तर तिसऱ्या लाटेत लहान मुलांना होणारा त्रास होणार नाही. कोरोनामुळे त्रस्त असलेल्या गरीब रुग्णांचेही आर्थिक हाल होणार नाहीत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत योग्य त्या सुविधा मिळाल्या नाहीत. यामुळे अनेकांचे प्राण गेले. त्यामुळे काही दिवसांपूर्वी आ. संजयमामा शिंदे यांच्यासह अनेकांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ढेले यांच्याकडे निवेदने दिली होती. याची दखल घेत, सध्या ग्रामीण रुग्णालयात तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन बेड निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. याच रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्ट उभा करण्यात येणार आहे.
कुर्डूवाडी शहराची लोकसंख्या ४० हजाराच्या पुढे असून, ग्रामीण भागाचे रुग्णही शहरातील ग्रामीण रुग्णालय व खासगी दवाखान्यावर अवलंबून आहेत. त्या तुलनेत शहरात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. शहरात एक शासकीय ग्रामीण रुग्णालय असून तेथे ऑक्सिजनयुक्त व व्हेंटिलेटर बेडची सोय नसल्याने सर्व भार सध्या खासगी रुग्णालयावर येत आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना पैशाअभावी उपचार घेणे शक्य होत नाही. शहरात सध्या डी.सी.एच.सी. बेड असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये डॉ. साखरे हॉस्पिटल - बेड १८, डॉ. बोबडे हॉस्पिटल - ३०, आधार हॉस्पिटल - ५५ अशी बेडची सुविधा आहे. आता जिल्हा आरोग्य विभागात अशी यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची झळ सर्वसामान्यांना बसण्यापूर्वीच तातडीने हे काम लवकर पूर्ण करण्यात यावे, अशीही मागणी नागरिकांतून होत आहे.
------
सर्वसामान्यांची परवड थांबणार
कोरोना महामारीच्या काळात शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी कुर्डूवाडी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले आहे. ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांची आर्थिक परवड थांबणार आहे. रेल्वे हॉस्पिटलमध्येही ही सोय उपलब्ध व्हावी अशी मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल. येथील ग्रामीण रुग्णालयातील ट्राॅमा केअर सेंटरसाठीही १ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर तोही प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
----