कुर्डूवाडीच्या शिक्षकाचे फेसबुक अकाऊंट हॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:22 AM2021-04-21T04:22:57+5:302021-04-21T04:22:57+5:30
करून पैसे उकळण्याचा केलेला प्रयत्न फसला कुर्डूवाडी : सावधान, फेसबुकवर युजर्सचे अकाऊंट हॅक करून युजर्सच्या फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींना मेसेज ...
करून पैसे उकळण्याचा केलेला प्रयत्न फसला
कुर्डूवाडी : सावधान, फेसबुकवर युजर्सचे अकाऊंट हॅक करून युजर्सच्या फ्रेंड लिस्टमधील व्यक्तींना मेसेज करून पैशाची मागणी केली जात असल्याचे प्रकार सर्वत्र घडत आहेत. नुकतेच कुर्डुवाडीतील नूतन शाळेच्या एका शिक्षकाच्या फेसबुक अकाऊंटलाही हॅक करून त्यातून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु त्या शिक्षकाच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न अखेर फसला.
यापूर्वी हॅकर्सनी कुर्डूवाडी शहरातील अन्य दोघांनाही अशाच प्रकारे फसवण्याचा प्रयत्न केला असल्याची माहितीही यानिमित्ताने समोर आली आहे.
कुर्डूवाडीतील एका शिक्षकाचे फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांच्या नावावर मेसेंजरद्वारे मेसेज करून दुसऱ्यांना पैशाची मागणी करून हॅकर्सचा पैसे उकळण्याचा प्रयत्न संबंधित शिक्षकांनी व त्याच्या मित्रांनी हाणून पाडला.
त्या शिक्षकाच्या फेसबुक अकाऊंट हॅक करून त्यांच्या नावावर मेसेंजरवर मेसेज करून मित्रांना ‘मी आजारी आहे, मला पैशाची गरज आहे, माझ्या अकाऊंटवर पैसे पाठवा, दोन दिवसात परत करतो, १२ हजार रुपये फोन पे करा’ असे मेसेज पाठवले होते. त्यामुळे शिक्षक मित्रांना याबाबत शंका आली. त्यांनी त्या शिक्षक मित्रालाच फोन लावून विचारले. त्यावेळी हा प्रकार फसवेगिरीचा असल्याचे लक्षात आले. सदर माहिती कुर्डूवाडी पोलीस स्टेशनचे सपोनि चिमणाजी केंद्रे यांच्या कानावर घालून सदर प्रकार सांगितला.
----
अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारु नका
या घटनांपासून नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असून अनोळखी रिक्वेस्ट स्वीकारू नये. पैशाची मागणी होत असल्यास खात्री केल्याशिवाय निर्णय घेऊ नये. व बनावट अकाऊंट लक्षात आल्यास संबंधिताला या बाबत कल्पना द्यावी. आपल्या फेसबुकवरील फ्रेंड रिक्वेस्ट या वेळोवळी तपासाव्यात, अशा सूचना पोलीस खात्याकडून करण्यात आल्या.
------