कुर्डूवाडीतील व्यापारी संकुल बनले दारूचा अड्डा, नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिकांतून संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 02:00 PM2017-11-07T14:00:23+5:302017-11-07T14:02:20+5:30
महात्मा फुले व्यापारी संकुलाचा पहिला मजला व टेरेस हा दारूचा अड्डा बनला असून, येथे दारू व बीअरच्या अनेक बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळल्या तर पहिल्या मजल्यावरच्या दुकानांचा लिलावच न झाल्याने ते गाळे अनेकांनी वापरात आणले आहेत.
इरफान शेख
कुर्डूवाडी दि ७ : महात्मा फुले व्यापारी संकुलाचा पहिला मजला व टेरेस हा दारूचा अड्डा बनला असून, येथे दारू व बीअरच्या अनेक बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत आढळल्या तर पहिल्या मजल्यावरच्या दुकानांचा लिलावच न झाल्याने ते गाळे अनेकांनी वापरात आणले आहेत. या दोन्ही ठिकाणी घाणीचे व कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. जिन्याच्या भिंतीवर पान, मावा खाऊन पिचकाºया मारण्यात आल्या आहेत.
रोज होत असलेल्या या प्रकाराकडे नगरपालिकेचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून याबाबत अधिकारी-पदाधिकारी काय भूमिका घेतात. याकडे शहराचे लक्ष लागून राहिले आहे. पहिला मजला सहा युडीमधून बांधण्यात आला आहे; मात्र या गाळ्यांचा लिलावच न झाल्याने तेथेही अस्वच्छता पसरली आहे. या गाळ्यातील अनेक ठिकाणी बांधकामानंतर तोडफोडही झालेली आहे. अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. हे गाळे जर लिलाव होऊन भाडे चालू झाले असते तर नगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली असती. या गाळे लिलावातून ५० ते ६० लाखांच्यावर डिपॉझिट स्वरुपात रक्कम नगरपरिषदेकडे कायमची जमा झाली असती व ५० ते ७० हजार रुपयांप्रमाणे महिना भाडे वसूल झाले असते. ही इमारत २ ते ३ वर्षांपासून लिलावाच्या प्रतीक्षेत आहे. एकूण नगरपालिकेच्या वसुलीचा हिशेब करता आतापर्यंत भाडेपट्ट्याने १० ते १५ लाख रुपये नुकसान झाले व ५० ते ७० लाख डिपॉझिटमधून अनेक विकासकामे झाली असती; मात्र याला जबाबदार कोण असा प्रश्न शहरातील नागरिक आता विचारु लागले आहेत; मात्र पदाधिकारी व प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत. याबाबत आरोग्य सभापतीकडे विचारणा केली असता त्यांनी याबाबत माहिती घेऊन सांगतो, असे सांगण्यात आले.
------------------------
व्यासपीठाचे निवेदन
महात्मा फुले व्यापारी संकुलाचा पहिला मजला ९५ टक्के बांधून पूर्ण झाला असून उर्वरित काम संथगतीने सुरू आहे. यामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असून हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे कुर्डूवाडी व्यासपीठाचे कार्याध्यक्ष डॉ. विलास मेहता यांनी मुख्याधिकाºयांकडे केली आहे. या निवेदनात उर्वरित काम पूर्ण करुन हे संकुलन नगररचना खात्याकडून नगरपरिषदेला हस्तांतर झाले नाही, अशी माहिती मिळाल्याचे नमूद आहे. या इमारतीस वॉचमन व योग्य सुरक्षा नसल्यामुळे नासधूस होऊन गैरवापर होत आहे. या निवेदनावर अध्यक्ष महावीर खडके, फुलचंद धोका यांची नावे आहेत.
-----------------
महात्मा फुले शॉपिंग सेंटरच्या पहिल्या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे. याचा प्रस्ताव टाऊन प्लॅनिंगकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. याची मंजुरी येताच त्रिसदस्यीय समिती याचे भाडे निश्चिती करेल. त्यानंतर याचा जाहीर लिलाव करण्यात येईल. शॉपिंग सेंटरमधील स्वच्छताही करण्यात येईल.
-कैलास गावडे,
मुख्याधिकारी, नगरपरिषद कुर्डूवाडी