सुशीलकुमारांच्या स्वप्नातील एसएसबी केंद्राच्या माळरानावर उगवलंय कुसळ..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:47+5:302021-09-26T04:24:47+5:30
============ चपळगाव : देशाचे रक्षण करण्यासाठी युवकांची फळी निर्माण व्हावी, सैन्यदलात येण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी केंद्रातील काँग्रेस ...
============
चपळगाव : देशाचे रक्षण करण्यासाठी युवकांची फळी निर्माण व्हावी, सैन्यदलात येण्यापूर्वी त्यांना प्रशिक्षण मिळावे यासाठी केंद्रातील काँग्रेस शासनाच्या काळात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी या दोन ठिकाणी सशस्त्र सीमा बल (एसएसबी) प्रशिक्षण केंद्राची योजना आखली. भूमिपूजन झाले. मात्र, हन्नूर (ता. अक्कलकोट) येथील नियोजित एस.एस.बी. प्रशिक्षण केंद्राचे काम पूर्णपणे रखडले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दूरदृष्टी ठेवून चांगली योजना जिल्ह्याला मिळवून दिली. मात्र, सुशीलकुमारांच्या स्वप्नातील हन्नूर येथील सशस्त्र सेना बलाच्या प्रशिक्षण केंद्राच्या नियोजित माळरानावर वर्षानुवर्षे कुसळ उगवत असल्याचे विदारक दृश्य निर्माण झाले आहे. वास्तविक, केंद्र शासनाची ही योजना संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासह सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकातील विजयपूर, कलबुर्गी यासह राज्यभरातील युवकांसाठी मोलाची ठरणार आहे. सैन्यदलात भरतीसाठी धडपडणाऱ्या तरुणांसाठी ही योजना लाभदायी ठरणार आहे. सद्य:स्थितीत याठिकाणी संबंधित विभागाकडून अर्धे डझन जवान तैनात केले असून, नियोजित जागेत अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.
----
८ जानेवारी २०१४ रोजी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते या योजनेचे भूमिपूजन झाले होते. यावेळी भारत सरकारचे गृह सचिव अनिल गोस्वामी, सशस्त्र सीमा बलचे महानिर्देशक अरुण चौधरी, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी सरपंच तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. मात्र, तरीही गेल्या आठ वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने या योजनेसाठी कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.
---
ही योजना तरुण पिढीसाठी दिशादर्शक ठरणार आहे. तसेच देशाच्या रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची असेल. या दुहेरी उद्दिष्टांमधून हन्नूर येथे सशस्त्र सीमा बल केंद्राची निर्मिती होणार आहे. मात्र, केंद्रातील आमची सत्ता गेली व ही योजना दुर्लक्षित झाली. ही योजना पूर्ण झाल्यास जिल्ह्यासह देशाला फार मोठा फायदा होणार आहे.
- सुशीलकुमार शिंदे
माजी केंद्रीय गृहमंत्री
---
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सशस्त्र सीमा बल प्रशिक्षण केंद्राची योजना अक्कलकोट तालुक्याला मिळवून दिली आहे. ही फार मोठी योजना आहे. फायदेशीर योजना असून, ती पूर्ण व्हावी यासाठी केंद्रातील मोदी शासनाकडे याविषयी पाठपुरावा करणार आहे.
- डाॅ. जयसिद्धेश्वर महास्वामी
खासदार