हुतात्मा स्मृती मंदिराच्या सुशोभीकरणासाठी स्थानिक कलाकारांचे श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 01:20 PM2020-11-13T13:20:40+5:302020-11-13T13:23:05+5:30
नाटकावर प्रेम असणाऱ्या सर्वांनीच सुशोभीकरणाच्या कामात पुढाकार घेतला
सोलापूर : हुतात्मा स्मृती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणास सुरुवात झाली आहे. महापालिकेकडून परवानगी घेऊन स्थानिक हौशी कलाकार हे श्रमदानातून परिसर अधिक चांगला करत आहेत.
शहरातील मध्यवर्ती भागातील हुतात्मा स्मृती मंदिराच्या भिंतीवर व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि इतरही काही लोक नाट्यगृहाशी संबंध नसलेल्या कार्यक्रमाच्या, व्यवसायाच्या जाहिराती, कार्यक्रम पत्रिका चिटकवतात. यामुळे नाट्यगृहाचे सौंदर्य नष्ट होत आहे. हे सौंदर्य पुन्हा खुलविण्यासाठी सोलापुरातील काही हौशी रंगकर्मींनी एकत्र येऊन हुतात्मा स्मृती मंदिराचे सुशोभीकरण करत आहेत.
बुधवार ११ नोव्हेंबरपासून या कामास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी अस्तित्व मेकर्सच्या १५ कलाकारांनी हुतात्मा स्मृती मंदिरासमोरील १२ खांबांवरील जाहिराती, स्टिकर्स काढले. तसेच या खांबावरील जुना रंग खरडून काढला. गुरुवारी परिसरातील भिंत स्वच्छ करुन त्यावरील जुना रंग काढण्यात येणार आहे. त्यानंतर खांब आणि भिंतीवर रंग देण्यात येणार आहे. व्यावसायिक माणसांऐवजी कलाकार स्वत: रंग देणार आहेत.
मुंबईत असणाऱ्या यशवंत नाट्यमंदिराप्रमाणे सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर सुशोभित करण्यात येणार आहे. नाट्यगृहाच्या बाहेरील परिसरात हे काम होणार असून रसिकांना नाट्यगृह आकर्षित वाटावे या दृष्टीने काम करण्यात येणार आहे. राज्य स्तरावरील नाटकांसोबतच सोलापुरात निर्मित होऊन प्रसिद्ध झालेल्या नाटकांची नावे भिंतीवर लिहिण्यात येणार आहेत.
नाटकावर प्रेम असणाऱ्या सर्वांनीच सुशोभीकरणाच्या कामात पुढाकार घेतला आहे. एखाद्या व्यावसायिक माणसांपेक्षा कलाकार स्वत: काम करत असून त्यांचे कलेविषयी आपुलकी, जिव्हाळा यातून दिसत आहे. नाट्यगृहाबाहेरील जागेवर रंगकाम करुन नाटक त्यांची नावे लिहिण्यासाठी देखील कलाकारच पुढे येतील.
- किरण लोंढे, कलाकार