पैशांच्या वादातून प्रियकराने प्रेयसीची केली हत्या, भाजपाच्या जिल्हा उपाध्यक्षासह तिघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 09:50 AM2018-09-13T09:50:35+5:302018-09-13T09:52:01+5:30
पैशांच्या वादातून प्रियकरानं प्रेयसीला विष पाजून तिची हत्या केली व यानंतर तिनं स्वतः विष प्यायल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मंगळवेढा - पैशांच्या वादातून प्रियकरानं प्रेयसीला विष पाजून तिची हत्या केली व यानंतर तिनं स्वतः विष प्यायल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणीचे नाव गीता वाघमोडे असे आहे. याप्रकरणी प्रियकर द्वारकेश सुर्यवंशी (वय 33 वर्ष), त्याची आई तथा भाजपाची जिल्हा उपाध्यक्षा शुभांगी सुर्यवंशी तसेच सागर भुईटे या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर द्वारकेश सुर्यवंशीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. तर अन्य दोघेजण फरार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिता वाघमोडे हिचे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शुभम झेरॉक्स सेंटरमध्ये कामास होती. आरोपी द्वारकेश सुर्यवंशी हा झेरॉक्स काढण्यासाठी तेथे येत असल्याने यांची 2013 मध्ये ओळख झाली, या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर ते दोघे वडदेगाव येथील शेतातील वस्तीवर राहत होते. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी सुरेखा शिंदे यांचा नातू सुयोग गाडेकर याने गीता हिनेे विष प्यायले असून तिला उपचारासाठी मंगळवेढ्यात आणले, मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तत्पूर्वी पैशाच्या कारणातून द्वारकेश सुर्यवंशी, शुभांगी सुर्यवंशी, सागर भुईटे यांनी मिळून माझ्या मुलीला जीवे मारण्याच्या उद्देशाने जबरदस्तीने विष पाजून तिची हत्या केली व तिने स्वतः विष प्यायल्याचा बनाव रचल्याचा आरोप गीताच्या आईनं केला.
याप्रकरणी कामती पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून द्वारकेश सुर्यवंशीला पोलिसांनी अटक केली आहे. अन्य दोन आरोपी फरार झाले आहेत.