लई बेस्ट झालं तलाव भरू लागले; परतीच्या पावसा गर्जना करत बरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:27 AM2021-09-17T04:27:29+5:302021-09-17T04:27:29+5:30
शिवानंद फुलारी अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर - बोरी मध्यम प्रकल्पासह विविध लघु पाटबंधारे साठवण तलावांपैकी तीन तलाव तुडुंब ...
शिवानंद फुलारी
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर - बोरी मध्यम प्रकल्पासह विविध लघु पाटबंधारे साठवण तलावांपैकी तीन तलाव तुडुंब भरले आहेत. काहींची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. परतीच्या पावसानं अक्कलकोट तालुक्यातील सर्व तलाव शंभरी गाठतील. ‘लई बेस्ट झालं तलाव भरु लागले. परतीच्या पावसा गर्जना करीत बरस’ अशी अपेक्षा तालुकावासीयांमधून व्यक्त होत आहे. यामुळे उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
सोलापूर पाटबंधारे विभागाचे अक्कलकोट तालुक्यात एकूण मोठे आठ तलाव आहेत. त्यापैकी भुरीकवठे, शिरवळवाडी, बोरगाव दे. हे तीन तलाव व तसेच कुरनूर- बोरी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरित डोंबरजवळगे (७७ टक्के), काझीकणबस (८५ टक्के), गळोरगी (५५
टक्के), घोळसगाव (७५ टक्के), तर सातन दुधनी, हंजगी हे तलाव अद्यापही मृतसाठ्यात आहेत. पाच तलाव शंभरीकडे वाटचाल करीत आहेत.
तसेच लघुपाटबंधारे स्थानिक स्तर विभागाकडे असलेले घोळसगाव येथील क्रमांक २ चे तलाव, बोरगाव दे. क्रमांक-२, कडबगाव, असे तीन तलावसुद्धा शंभर टक्के भरलेले आहेत.
----
एक दृष्टीक्षेप...
तालुक्यात समप्रमाणात पाऊस होत नसल्याने सातनदुधनी, हंजगी अशा काही तलावात अद्यापही मृत पाणीसाठा आहे. चिक्केहळ्ळी येथील साठवण तलाव पाच वर्षांपूर्वी फुटला तो अद्याप दुरुस्त झालेला नाही. यामुळे या तलावाखाली अवलंबून असणाऱ्या ग्रामस्थांना दुरुस्तीअभावी दरवर्षी उन्हाळ्यात मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. तोरणी, मराठवाडी, करजगी येथे मंजूर असलेल्या तलावाचे काम दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न अपुरे राहत आहे.
----
चिक्केहळ्ळी येथील तलाव दुरुस्तीसाठी तीन वेळा प्रस्ताव पाठवून दिला आहे; मात्र कधी निधीअभावी तर कधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रस्ताव पेंडिंग राहिला आहे. दुरुस्ती अभावी पाणीसाठा होत नाही. निधी मिळताच त्वरित काम सुरू करू.
- प्रकाश बाबा, उपविभागीय अधिकारी
-----