लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

By admin | Published: July 13, 2014 01:34 AM2014-07-13T01:34:43+5:302014-07-13T01:34:43+5:30

गुरुपौर्णिमा : अक्कलकोटमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रांग

Lakhs of devotees took Shree's philosophy | लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

लाखो भाविकांनी घेतले श्रींचे दर्शन

Next



अक्कलकोट : सद्गुरू ‘श्री स्वामी समर्थ महाराज की जय’चा जयघोष करीत श्री स्वामी समर्थ महाराजांचे लाखो भाविकांनी शनिवारी दर्शन घेतले़ गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची रांग लागलेली होती़
श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिरात पहाटे ४़३० वाजता काकडारती झाली़ त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले़ मंदिरापासून फत्तेसिंह चौकापर्यंत भाविकांची रांग लागली होती़ सकाळी ११़३० वाजता श्रींची आरती करून नैवेद्य दाखविण्यात आला़ रात्री ८़३० वाजता शेजारती करण्यात आली़ भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून नियमित केले जाणारे अभिषेक रद्द करून नारळ, हार प्रसाद म्हणून देण्यात आला़
भाविकांना सुलभ दर्शन व्हावे म्हणून विश्वस्त महेश इंगळे, सचिव सुभाष शिंदे, विलास फुटाणे, आत्माराम घाडगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले़ भक्त निवासात भाविकांच्या प्रसादासाठी गणेश दिवाणजी व सेवेकऱ्यांनी परिश्रम घेतले़
स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून दुपारी १२ वाजता खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, पुण्याचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे हृदय शल्यचिकित्सक श्री. व सौ. डॉ़ रणजित जगताप, सांधेरोपणतज्ज्ञ श्री. व सौ. डॉ़ हेमंत वाळणकर, डॉ़ वैजयंती लागू, जोशी यांच्या हस्ते श्रींना नैवेद्य दाखविण्यात आला़ दरम्यान, सर्व मान्यवरांचा मंदिर समितीच्या वतीने विश्वस्त महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़
श्री स्वामी समर्थ मंदिर, समाधीमठ येथे विनायक खोबरे व सुनंदा खोबरे यांच्या हस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली़ गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळी ८ ते १० दरम्यान स्वामी समर्थ सारामृताचे पारायण, १० ते ११ दरम्यान नामस्मरण व श्रीगुरुपूजा करण्यात आली़ नियोजित वेळेत लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला़ यासाठी अध्यक्ष जन्मेजय भोसले, शाम मोरे, अभय खोबरे, अमोल भोसले, आप्पा हंचाटे यांच्यासह सेवेकरी मंडळींनी परिश्रम घेतले़
शिवपुरी परमसद्गुरु श्री गजानन महाराज संस्थेतर्फे राम गल्लीतील गुरुमंदिरात शुक्रवारी रात्रभर भारुड, कीर्तन कार्यक्रम पार पडला़ सकाळी ८ वाजता पालखी मिरवणूक निघाली़ त्याचा शुभारंभ व स्वामी समर्थ पादुकांची पूजा डॉ़ पुरुषोत्तम व डॉ़ गिरीजा राजीमवाले यांच्या हस्ते करण्यात आली़ या मिरवणुकीत आष्टाकासार, कल्लनिंबाळ, उस्मानाबाद, कुरुंदवाड, अहमदनगर, सोलापूर येथील भाविक सहभागी झाले होते़ तसेच शारदामाता प्रशालेचे विद्यार्थीही सहभागी होते़ विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयावर पथनाट्य सादर केले़ कार्यक्रमासाठी जितेंद्रकुमार जाजू, भूपतभाई व्होरा, मुकुंद कुलकर्णी, गोपीराव, औरंगाबादकर, शाम जाजू, अण्णा वाले यांनी परिश्रम घेतले़
गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश व गुजरात या राज्यातील व पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी आलेल्या असंख्य भाविकांनी अक्कलकोट येथे येऊन श्रींचे दर्शन घेतले़ गेल्या दोन दिवसांपासून भक्तनिवास, यात्रीभुवन, मुरलीधर मंदिर आदी निवासस्थानाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली होती़
--------------------
१८१ पोलिसांचा बंदोबस्त
गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन व पुणे येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर १८१ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता़ त्यात १२ फौजदार, तीन पोलीस निरीक्षक, ६५ सुरक्षा बल पोलीस, सीआरपीएफचे ५० पोलीस कर्मचारी, २० महिला पोलीस, स्ट्रायकिंग फोर्सचे १० कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक जाधव यांनी सांगितले़

Web Title: Lakhs of devotees took Shree's philosophy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.