मोठी बातमी; चैत्री वारीला लाखो भाविक येणार; दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार
By Appasaheb.patil | Published: March 29, 2023 01:52 PM2023-03-29T13:52:13+5:302023-03-29T13:53:28+5:30
येत्या २ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक येत असतात.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : येत्या २ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या चैत्री यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात लाखो भाविक येत असतात. भाविकांची संख्या लक्षात घेता सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने योग्य नियोजन करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे.
चैत्री वारीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपुरात पोलिस बंदोबस्त असणार आहे. भाविकांची संख्या लक्षात घेता दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यात तीन पोलीस उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ४३ सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, ५४४ पोलीस अंमलदार, ६०० होमगार्ड, एक राज्य राखीव पोलीस बलाची तुकडीही तैनात करण्यात येणार आहे.
दरवर्षी वारीच्या निमित्ताने राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात येतात. आलेल्या भाविकांना सेवासुविधा मिळाव्यात यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. चैत्री वारीच्या निमित्ताने मंदिर समितीच्यावतीनेही मंदिर परिसरात विविध सेवासुविधा निर्माण करण्यात येत आहेत. वाढत्या उन्हामुळे भाविकांना त्रास होऊ नये याबाबतची खबरदारी मंदिर समिती घेत आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"