लाखो सिद्धेश्वर भक्तांनी अनुभवला याची देही याची डोळा सोलापुरातील सिद्धरामेश्वरांचा अक्षता सोहळा
By Appasaheb.patil | Published: January 14, 2024 02:50 PM2024-01-14T14:50:49+5:302024-01-14T14:51:06+5:30
अखंड जयघोष अक्षता सोहळ्याच्यावेळी दिसून आला.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेचं मुख्य विधी असलेला अक्षता सोहळा आज रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पार पडला. लाखो सिद्धेश्वर भक्तांनी हा अभूतपूर्व असा सोहळा अनुभवला. बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र , श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष अक्षता सोहळ्याच्यावेळी दिसून आला.
कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून सकाळी मानाचे सातही नंदीध्वज वाजतगाजत सिद्धेश्वर मंदिराकडे निघाले. नंदीध्वज सम्मती कट्ट्याजवळ आल्यावर कुंभार समाजाच्या मानकऱ्यांना मानकरी हिरेहब्बू व देशमुख यांच्याकडून मानाचा विडा देण्यात आला. योगदंडाच्या साक्षीने पूजा झाली. मानकरी सुहास व तम्मा शेटे यांच्याकडून मंगलाष्टका दिल्या जातात. संम्मती कट्टा येथे सुहास शेटे यांनी संम्मतीवाचन केले. त्यानंतर पावणे दोन वाजता अक्षता सोहळा पार पडला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींसह राजकीय नेत्यांची मंदियाळी देखील या विवाह सोहळ्यात पाहायला मिळाली.
सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी बाराबंदी घालून या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महापालिका, महसूल, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.