‘लक्ष्मी’च्या पावलांनी केली भावांची ओवाळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:45 PM2018-11-10T12:45:35+5:302018-11-10T12:47:19+5:30
अनोखी भाऊबीज : दोन्ही हातांनी अपंग, बहीण नसलेल्या बंधूंशी जोडले नाते
यशवंत सादूल
सोलापूर : वेड्या बहिणीची ही वेडी माया...ओवाळीते मी भाऊराया... या सोलापूरच्याच कवी संजीव यांच्या मराठीतील अजरामर कवितेची साक्षात प्रचिती आली ती भाऊबीजेनिमित्त.
हैदराबाद रोडवर असलेल्या विडी घरकूल परिसरातील गोंधळी वस्ती येथे लहानशा झोपडीत राहणाºया व दोन्ही हातांनी जन्मताच अपंग असलेली लक्ष्मी शिंदे या ध्येयवेड्या बहिणीने आपल्या भावासोबतच परिसरात राहणाºया पण बहीण नसलेल्या बोल्ली कुटुंबातील साईराम, सोहन, मनीष या तीन भावंडांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. आपल्या घरासमोरील छोट्याशा जागेतच या भावंडांना भाऊबीजेसाठी बोलाविले़ आपल्या पायाच्या अंगठ्यांनी त्यांना टिळा लावला. त्यांच्या हातात रुमाल देत पायांनीच ओवाळणी केली. बोल्ली कुटुंबाने लक्ष्मीच्या कल्पकतेचे कौतुक करीत भावुक झाल्याचे चित्र दिसून आले.
लक्ष्मी संजय शिंदे ही जन्मत: दोन्ही हातांनी अपंग आहे़ हातच नसल्याने तिला शाळेत प्रवेश मिळण्याचा प्रश्न होता़ पण वडील संजय शिंदे यांनी प्रयत्न करून लक्ष्मीला शाळेत घातले़ दोन्ही हात नसलेल्या लक्ष्मीने शालेय शिक्षण घेत चक्क पायाने पेपर लिहून दहावी व बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली. स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती शिकतच आहे़ तिला आधार मिळाला जळगावच्या दीपस्तंभ या संस्थेचा़ सध्या ती एमपीएससी व युपीएससीच्या (स्पर्धा परीक्षा)अभ्यासासोबतच बी़ ए़ चे शिक्षण घेत आहे.
दरवर्षी दिवाळीला आपल्या एकुलत्या एक भावाची ओवाळणी (भाऊबीज) सण साजरा करण्यासाठी सोलापूरला येते़ यंदा तिच्या भावासोबतच आपल्या वस्तीत असलेल्या पण बहीण नसलेल्या भावांची ओवाळणी करून भाऊबीज करण्याचे ठरविले़
बोल्ली कुटुंबातील नवव्या इयत्तेत शिकत असलेल्या साईराम, सहावीतील सोहम व चौथीतील मनीष यांची ओवाळणी केली़ पायाच्या अंगठ्याने लक्ष्मीने आपल्या भावंडांच्या कपाळावर टिळा लावला आणि त्यांच्या हातात रुमाल देत त्याचे औक्षण केले़ लक्ष्मीने दिलेला रुमाल न्याहाळून पाहताना सर्वच बंधू हरवून गेले होते़ लक्ष्मीच्या पाया पडून त्यांनी आशीर्वाद घेतला.
पायानेच काढते चित्र
- लक्ष्मीची शिकण्याची मोठी जिद्द असून तिला जिल्हाधिकारी व्हायचे आहे़ ती पायांनी चित्रे काढते़ निसर्ग चित्रे काढण्यात तिचा हातखंडा आहे़ घरातील सर्व कामे स्वयंपाक, धुणी, भांडी करते़ तिला कविता करता येतात़ तिची भावनिक गुंतवणूक ही मोठी आहे़ आपले नातलग व वस्तीतील सर्व कुटुंबीयांशी तिचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत़ हे नाते जपण्यासाठी यंदा बहीण नसलेल्या भावासोबत भाऊबीज करण्यासाठी सोलापुरात आली़ औक्षण करताना तिच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहत होता़
मी मार्च २०१५ दहावी आणि २०१७ मध्ये बारावीची परीक्षा पायाने लिहून देत असल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमत ने ‘लक्ष्मीच्या पावलांनी सरस्वतीची उपासना’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले.त्याचे सकारात्मक प्रतिसाद समाजात उमटले़ पण माझे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जळगावच्या यजुर्वेद महाजन यांच्या दीपस्तंभ संस्थेने पुढाकार घेतला़ मी सध्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत पदवीचे शिक्षण घेत आहे़ लोकमतमुळेच मी प्रकाशात आले त्याचा मला अभिमान आहे़
- लक्ष्मी संजय शिंदे, विद्यार्थिनी, सोलापूर