लालबाग अन पायरीची आवक वाढली, सोलापुरात आंबे खरेदीसाठी गर्दी झाली
By काशिनाथ वाघमारे | Updated: April 21, 2023 17:11 IST2023-04-21T17:11:11+5:302023-04-21T17:11:37+5:30
पायरी कमीच, दरात घसरण

लालबाग अन पायरीची आवक वाढली, सोलापुरात आंबे खरेदीसाठी गर्दी झाली
सोलापूर : अक्षयतृतीयेनिमित्त बाजार पेठांमध्ये दोन दिवसात आंब्यांची आवक वाढली आहे. हापूस वगळता लालबाग आणि पायरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दराहीत १०-२० रुपयांची घसरण झाली असून रसाळ आंब्यांच्या खरेदीसाठी सर्वसामान्यांची गर्दी लोटली आहे.
बाजार समितीच्या मते आवक कमी आहे. आता काही शेतकरीच मार्केटींगमध्ये उतरल्याने बाजार समितीत आवक मागील वर्षीच्या तुलनेत थोडी कमी वाटते. तरी विजापूर रोड, होटगी रोड, सात रस्ता हैदराबाद रोड आणि पुणे रोडवर रस्त्याच्या कडेला खुली विक्री मोठ्या प्रमाणात आहे.
या आंबा प्रकारात पायरी आणि लालबाग हे स्वस आणि रसाळ समजले जात असल्याने सर्वसामान्यांचा कल याकडे अधिक आहे. त्याचा रसही करायला महिला वर्गांना सोपे जाते. मागील १५ दिवसात जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आला आणि नेमका सिझनमध्ये मोहोर गेला. त्यामुळे गावरान आंबे बाजारात येऊ शकलेले नाहीत. आता औषध फवारणी करुन पुन्हा मोहोर आणून आंबे काढण्यासाठी उत्पादकांची धडपड दिसून येते.
शुक्रवारचे आंबा दर ...
हापूस : ५००-८०० रुपये
लालाबाग : ६०-१०० रुपये
केसर : १००-१४० रुपये
बदाम : ६०-८० रुपये
हापुसाच्या २३६ पेट्या, केसर ८२ क्विंटल आवक
शुक्रवारी सोलापूर बाजार समितीत पायारी, बदाम अशा आंब्यांची ११९ क्विंटल आवक आहे. हापूस आंब्यांची २३७ पेट्यांची आवक आणि केसर आंब्यांची ८२ क्विंटल एका दिवसात आवक झाली आहे. बाजार समितीतूनही आंबा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.