लालपरी ५०० किलोपर्यंत माल वाहणार; नव्या विभागात बाराशेजण राबणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:42 AM2020-11-09T11:42:33+5:302020-11-09T11:42:38+5:30
नवीन वर्षातील मुहूर्त : उत्पन्नवाढीसाठी आता स्वत:ची सेवा
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून ‘एसटी’च्या उत्पन्न वाढीसाठी विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी आता प्रशासन स्वत:ची पार्सल सेवा पुन्हा सुरू करणार आहे. यासाठी मात्र नवीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती एसटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
सध्या एसटीची पार्सल सेवा एका खासगी कंपनीकडून चालवण्यात येत आहे; बसमधून जास्तीतजास्त पाचशे किलोपर्यंत पार्सल घेऊन जाता येणार आहे. यासाठी प्रशासनाच्या बाराशे कर्मचाऱ्यांची निवड करून एक वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे़ याला पार्सल अॅन्ड लॉजिस्टिक डिपार्टमेंट असे नाव देण्यात येणार असून या माध्यमातून पार्सल आणि मालवाहतूक सेवा या दोन्ही सुरु होणार आहेत.
या सेवेच्या नियंत्रणासाठी वाहतूक नियंत्रक हा विभागप्रमुख आणि सहायक हे त्यांना मदत करतील. यासाठी प्रत्येक स्टॅन्डवर एक स्वतंत्र विभाग असणार आहे़ सध्या खासगी कंपनीकडून सुरू असलेल्या सेवेबद्दल पुढील काही दिवसातच निर्णय होणार आहे.
उत्पन्न वाढणार
नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासनाकडून पार्सल सेवा सुरू करण्यात आली होती़ पण त्यानंतर पार्सल सेवेसाठी खासगी कंपनी निवडण्यात आली़ यासाठी कंपनीकडून जवळपास ३६ कोटी रुपये प्रशासनाला मिळतात़ प्रशासनाने हा विभाग पुन्हा सुरू केल्यास प्रशासनाला कंपनीपेक्षा दुप्पट उत्पन्न मिळेल असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.