वासुद येथून सव्वा लाखाचे सोने-चांदीचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:23 AM2021-09-11T04:23:52+5:302021-09-11T04:23:52+5:30
वासुद येथील सुनंदा पांडुरंग केदार व त्यांची सून ज्ञानेश्वरी विकास केदार या बुधवारी रात्री १० च्या सुमारास जेवण करून ...
वासुद येथील सुनंदा पांडुरंग केदार व त्यांची सून ज्ञानेश्वरी विकास केदार या बुधवारी रात्री १० च्या सुमारास जेवण करून स्वयंपाक खोलीचा दरवाजा बंद करून झोपल्या. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास स्वयंपाक खोलीच्या बंद दरवाजाची कडी काढून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील २ तोळ्याचे सोन्याचे गंठण, २ ग्रॅम ९६० मिली सोन्याची डोरली व मणी, १ ग्रॅम २०० मिली सोन्याची अंगठी, साडेतीन भार चांदीचे पैंजण, दीड भार चांदीची जोडवी, १ भार चांदीचा छल्ला, दीड भार चांदीचा करंडा, दीड भार चांदीचा बाळकृष्ण, अडीच भार चांदीची वाटी, अडीच भार चांदीचे पैंजण यासह रोख २५०० रुपये असा १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. याबाबत सुनंदा केदार यांनी गुरुवारी अज्ञात चोरट्याविरुध्द फिर्याद दिली आहे.
घटनास्थळी पोलिसांची पाहणी
वासुद-केदार मळा येथील घरफोडीची दखल घेऊन मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, नागेश यमगर, हेमंतकुमार काटकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी चोरट्याचा माग काढण्यासाठी सोलापूर येथील ठसेतज्ज्ञांना पाचारण केले. लवकरच या घरफोडीचा तपास लावला जाईल, असे राजश्री पाटील यांनी सांगितले.