कोरोनाची लागण होऊ नये म्हणून तेलुगू भाषिक अंगणात लावताहेत दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:54 AM2020-03-28T11:54:49+5:302020-03-28T11:56:31+5:30
पूर्व भागात नवा प्रकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, अंगणात दिवे लावून देवाकडे आपत्ती टाळण्यासाठी महिलांकडून प्रार्थना
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पूर्व भागातील तेलुगू भाषिक अंगणात रांगोळी काढून दिवे लावताहेत़ घरात रात्री उशिरा पूजाविधी करताहेत़ तीन दिवसांपूर्वी काही मोजकेच लोक दिवे लावत होते़ आता दिवे लावणाºयांची संख्या वाढत आहे़ असे का करताहेत याबाबत विचारले असता कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दिवे लावून प्रार्थना करत असल्याची माहिती पूर्वभागातील महिलांनी दिली.
यंदाच्या गुढीपाडव्यात कीड आहे़ एक मुलगा असलेल्या महिलांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे, त्याकरिता अंगणात दिवे लावून देवाकडे आपत्ती टाळण्याची प्रार्थना करत असल्याच्या भावना काही महिलांनी व्यक्त केल्या़ यापूर्वी ग्रहण काळातदेखील असाच प्रकार पूर्वभागात सुरू होता.
बहुतांश महिला विडी कामगार अशिक्षित असल्याने त्यांना अंधश्रद्धेची लागण वारंवार होत असल्याची भावना पूर्वभागातील सुशिक्षित युवकांनी व्यक्त केली आहे़ ही निव्वळ अफवा असून असा प्रकार नेहमी घडतो, असेही युवकांनी सांगितले़ नीलमनगर, दत्तनगर, जुने विडी घरकूल, शास्त्रीनगर, नवीन विडी घरकूल, सत्तर फूट रोड, अशोक चौक परिसरातील नागरिकांच्या घरासमोर दिवे लागलेले दिसताहेत.
गुढीपाडव्याची कीड़.. ही निव्वळ अफवा़..
- याबाबत अधिक माहिती देताना पूर्व भागातील ज्येष्ठ पुरोहित वेणुगोपाल जिल्ला यांनी सांगितले, यंदाच्या गुढीपाडव्यात कीड आहे, अशी एक अफवा सोलापूर, पुणे, मुंबई आणि नगर परिसरात पसरली आहे़ एक मुलगा असलेल्या महिला शेजारील पाच घरांतील पाणी आणून अंगणात शिंपडावे आणि रांगोळी काढून दिवा लावावा, असे केल्यास कीड नाहीशी होते, अशी अफवा सर्वत्र फिरत आहे़ अशी अफवा वारंवार पसरते़ प्रतिवर्षी संक्रांतीला असा प्रकार आढळून येत होता, आता गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक दिवे लावताहेत़ हे चुकीचे आहे़ यात काही तथ्य नाही़ लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये़ कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही पुरोहित जिल्ला यांनी केले आहे़