सोलापूर जिल्ह्यातील १६ महामार्गांचे भूसंपादन, इतर कामांसाठी येणार १६ हजार कोटींचा निधी, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:26 AM2018-01-10T11:26:17+5:302018-01-10T11:33:59+5:30
आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : आगामी काळात जिल्ह्यात १६ राष्ट्रीय महामार्गांची कामे होणार आहेत. या कामांच्या भूसंपादन व इतर कामांसाठी १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा निधी येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादनाचे एकही काम रखडणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचा वार्तालाप आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सुरुवातीला शालेय जीवनापासून पशुवैद्यकीय पदवीपर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. ते म्हणाले की, पदवी घेतल्यानंतर काही दिवस मार्केटिंगचे काम केले. माझे नेहमी सांगणे असते की, माणसाने आयुष्यात सेल्समन म्हणून काम करायला हवे. मग आपण किती पाण्यात आहोत हे समजते. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात काही दिवस पशुवैद्यकीय अधिकारी म्हणूनही काम केले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करुन उपजिल्हाधिकारी झालो आणि रत्नागिरी येथे रुजू झालो. प्रशिक्षणार्थी तहसीलदार म्हणून काही दिवस उल्हासनगर येथेही काम केले. १९९५ ची निवडणूक, २००९ ची माढा लोकसभा निवडणूक आदींच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. मला २५ ते २६ वरिष्ठ अधिकाºयांसोबत सेकंड इन कमांड म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यातून खूप शिकायला मिळाले, असेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन प्रमोद बोडके यांनी केले.
-----------------------------
सामाजिक आणि संवेदनशील पैलूंचाही उलगडा
वार्तालापात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या कार्यशैलीचा आणि संवेदनशील पैैलूंचाही उलगडा झाला. जव्हार येथे प्रातांधिकारी म्हणून काम करतानाचा किस्सा सांगताना डॉ. भोसले म्हणाले की, जव्हार येथील आदिवासी भागातील अनेक लोक जमिनीच्या वादासंदर्भातील सुनावणीला येत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे एके दिवशी एसटी चालक आणि कंडक्टर यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर रात्री मुक्कामाला जाणाºया बस चालकांकडे नोटिसा देऊन त्या पोहोच होतील, अशी व्यवस्था केली. शेवटी लोकांमध्ये मिसळून काम केल्याशिवाय कामे पूर्ण होणार नाहीत.
जलसंपदा विभागाने माणसांना प्राधान्य द्यावे
सिध्देश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरासाठी उजनीतून पाणी सोडावे, अशी मागणी महापालिकेने केली आहे. मात्र जलसंपदा विभागाने थकीत पाणीपट्टी भरल्यानंतर पाणी सोडू अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी म्हणाले की, यात्रा असल्याने भाविक आणि माणसांना प्राधान्य देऊन शहराला पाणी सोडावे, असे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. थकीत पाणीपट्टीसंदर्भात बैठक घेऊ, असे त्यांना सांगितले आहे. सिध्देश्वर यात्रेतील रस्त्याचा विषय हा धगधगता नाही. तो माझ्यासाठी आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले.
----------------------------
जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचे सल्ले
- आम्ही प्रशासनातील लोक हे जनरल फिजिशियनसारखे आहोत. समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असलेली औषधे, आयुधे कोणती आहेत ही माहिती हवी. ही आयुधे वापरून लोकांची कामे करायला हवीत.
- एसीमध्ये बसून काम करण्याऐवजी लोकांमध्ये जा, माहिती घ्या आणि काम करा.
च्अपमान लक्षात ठेवावा, त्यातून शिकावे पण अपमान करणाºयाला लक्षात ठेवू नये.
- मुंबई उपनगरात काम करताना ४० हजार अतिक्रमणे काढली, परंतु एकदाही वाद झाला नाही. बुल्डोझर घेऊन फिरण्यापेक्षा कायदेशीर मार्गांचा पुरेपूर वापर केला तर प्रश्न मार्गी लागू शकतो हे मी दाखवून दिले आहे.