धरणग्रस्त शेतकऱ्याची जमीन केली हडप

By admin | Published: July 12, 2014 12:11 AM2014-07-12T00:11:55+5:302014-07-12T00:11:55+5:30

तलाठ्याचा प्रताप; खरेदी न देता सात-बारावर चढविले नाव

The land of the damaged farmer has been made | धरणग्रस्त शेतकऱ्याची जमीन केली हडप

धरणग्रस्त शेतकऱ्याची जमीन केली हडप

Next


सोलापूर : माढा तालुक्यातील उजनी (टें) येथील एका धरणग्रस्त शेतकऱ्यास मिळालेली जमीन हडप करण्याचा प्रकार संगणकीय उताऱ्यामुळे उघडकीस आला आहे. खरेदी न देता अन्य व्यक्तीचे नाव उताऱ्यावर चढवून धरणग्रस्त शेतकऱ्याचे नाव कमी करण्याचा प्रताप तलाठ्याने केला आहे. संबंधित तलाठ्यावर कारवाई करून जमीन परत देण्याची मागणी धरणग्रस्त शेतकऱ्याचे पुत्र परमेश्वर तुकाराम मेटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले की, मी उजनी धरणग्रस्त आहे. माझे आजोबा बापूराव निवृत्ती मेटे यांच्या नावे उजनी धरणात जमीन गेल्याने माझे वडील तुकाराम बापूराव मेटे, ज्ञानेश्वर बापूराव मेटे, नवनाथ बापूराव मेटे हे माझे चुलते यांच्या नावे शिरापूर (ता. मोहोळ) येथे गट नं. १६५/१/ब/२ क्षेत्र दोन हेक्टर ८० आर आकार ६.४५ इतकी जमीन मिळाली आहे. माझे चुलते ज्ञानदेव मेटे व नवनाथ मेटे यांनी त्यांच्या हिश्श्याची १ हेक्टर ८७ आर, आकार ४.३० जमीन संजय तानाजी वाघमोडे यांना विकलेली असून माझ्या वडिलांच्या हिश्श्याचे ९३ आर क्षेत्र शिल्लक आहे.
माझे वडील तुकाराम यांच्या नावावरील जमीन सातबारा व आठ अ उताऱ्यावरील क्षेत्र सेतू कार्यालयात क्षेत्र नावावर दाखवत आहे. तलाठी कार्यालयामध्ये तलाठ्याने माझ्या वडिलाचे नाव अनधिकृतपणे व बेकायदेशीरपणे कमी करुन संजय वाघमोडे यांनी नाव लावून माझे हक्क संपविले आहे. माझे वडील १८ डिसेंबर २०११ पासून पक्षाघात या गंभीर आजाराने अंथरुणावर झोपून आहेत. याचा गैरफायदा घेत तलाठ्याने दप्तरी वाघमोडे यांचे नाव लावले आहे. त्याची चौकशी होऊन संबंधित तलाठ्यावर कारवाई करावी व माझ्या वडिलांचा हक्क त्यांना द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आणि डोळे उघडले
उजनी धरणग्रस्तांना मिळालेली वडिलोपार्जित जमीन कोणीतरी विकण्यास काढल्याची माहिती मिळाल्यानंतर परमेश्वर मेटे यांनी शिरापूर येथे जाऊन चौकशी केली. तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा काढल्यावर त्या उताऱ्यावर वडिलांचे नाव नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी तातडीने सेतू कार्यालयात जाऊन सातबारा व आठ अ उतारा काढला, त्या उताऱ्यावर वडिलांचे नाव असल्याचे दिसून आले. यानंतर तलाठ्याने बेकायदेशीरपणे आपले नाव सातबारा उताऱ्यावरुन उडविल्याचे त्यांच्या लक्षात आले. गेल्या तीन महिन्यांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालय, मोहोळ तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.

Web Title: The land of the damaged farmer has been made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.