Solapur: भूमी अभिलेख :जमीन बळकावण्याचे प्रमाण थांबणार; थेट उपग्रहाद्वारे मोजणी होणार
By संताजी शिंदे | Published: March 1, 2023 07:24 PM2023-03-01T19:24:04+5:302023-03-01T19:24:48+5:30
Solapur: सोलापूर जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी, जिल्हा भूमी अभिलेख विभागाला एकूण ३८ मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत.
सोलापूर : जिल्ह्यातील जमीन मोजणीची प्रकरणे वेगाने आणि अचूक होण्यासाठी, जिल्हा भूमी अभिलेख विभागाला एकूण ३८ मोजणी यंत्रे (रोव्हर मशीन) जिल्हा नियोजन मंडळ आणि राज्य शासनाकडून प्राप्त झाली आहेत. उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे (सिग्नल) रोव्हर मशीनच्या माध्यमातून मिळणारे अक्षांश आणि रेखांश हे कायमस्वरूपी जतन होणार आहेत.
जमीन मोजणी ही वेगाने आणि अचूक होण्यासाठी ३८ रोव्हर मशीन उपलब्ध झाल्या आहेत. या मशीनद्वारे मोजणी करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन मशीन उपलब्ध झाल्यानंतर जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा वेगाने करणे सहज सोपे होणार आहे. शिवाय एका प्रकरणाची मोजणी केवळ अर्ध्या तासात पूर्ण होऊ शकणार आहे. काही ठिकाणी बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार घडतात. मात्र, रोव्हर मशीनद्वारे जमिनीचे अक्षांश आणि रेखांश हे निश्चित होत असल्याने बांध खोदून दुसऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते समजणार आहे. भूकंप, पूर किंवा अन्य कोणत्याही नैसर्गिक आपत्तींमुळे जमिनीच्या खुणा गेल्या, तरीही हद्द निश्चित करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.
मशीनद्वारे अशी होईल मोजणी
० रोव्हर मशीनने मोजणी करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने मोजणी स्थानके (कॉर्स) उभारली जात आहेत.
० उपग्रहाच्या आधारे प्राप्त होणाऱ्या तरंगलहरीद्वारे मोजणी करायच्या ठिकाणांचे अक्षांश आणि रेखांश दर्शविण्यात येईल.
० कॉर्सद्वारे होणारी मोजणी ही रोव्हरमध्ये साठविली जाणार आहे.
० अक्षांश-रेखांशांवरून ऑटोकॅड संगणकप्रणालीचा वापर करून नकाशे तयार होणार आहेत.
० रोव्हर मशीनमुळे १० एकर जमिनीची मोजणी केवळ ३० मिनिटांत पूर्ण करणे शक्य आहे.
पाच हजार प्रकरणे प्रलंबित
कमी मनुष्यबळामुळे मोजणीसाठी आलेली प्रकरणे रखडली आहेत. जिल्ह्यातील जमीन मोजणी संबंधीची ५ हजार प्रकरणे सध्या जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. रोव्हर मशीन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढले जातील, सद्य:स्थितीत सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रलंबित असणारी प्रकरणे मार्चपूर्वी निकाली काढण्याचे नियोजन केले आहे.
- हेमंत सानप
(अधीक्षक, जिल्हा भूमी अभिलेख विभाग, सोलापूर)
भाऊबंदकीत निर्माण होणार वाद कायमचे मिटणार!
मोजणी कायमस्वरूपी व उपग्रहातून होणार असल्याने जमिनींच्या बांधांवरून होणारी भाऊबंदकी कायमची मिटणार आहे. या पद्धतीने होणाऱ्या मोजणीमुळे बांध खोदून जमीन बळकावण्याचे प्रकार कायमचे थांबणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे मोजणीच्या खुणा गेल्या, तरी अक्षांश आणि रेखांशांच्या सह्याने पूर्वीच्या खुणा मिळू शकणार आहेत.