संजय शिंदे अन् राजेंद्र राऊत यांच्यात ‘बघून घेतो’ ची भाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:43 AM2019-03-28T11:43:51+5:302019-03-28T11:47:48+5:30

माढा लोकसभा मतदारसंघ: फोनवरून झाली जोरदार बाचाबाची

Language of 'beholds' between Sanjay Shinde and Rajendra Raut | संजय शिंदे अन् राजेंद्र राऊत यांच्यात ‘बघून घेतो’ ची भाषा

संजय शिंदे अन् राजेंद्र राऊत यांच्यात ‘बघून घेतो’ ची भाषा

googlenewsNext
ठळक मुद्देमाढा लोकसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या चढाओढीतून ही बाचाबाची झाल्याचे समजते. माढा तालुक्यातील शिंदे विरोधकांची राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणल्यानंतर वाद आणखी चिघळला

बार्शी/कुर्डूवाडी: भाजपापासून दूर जाऊन राष्ट्रवादीची उमेदवारी घेतलेले सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व त्यांचेच पूर्वाश्रमीचे महाआघाडीतील मित्र, बार्शीचे माजी आ़मदार राजेंद्र राऊत यांच्यात राजकीय घडामोडीवरून हमरीतुमरीवर शिवीगाळ झाल्याचे वृत्त आहे. माढा लोकसभा मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या चढाओढीतून ही बाचाबाची झाल्याचे समजते.

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठेची केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी आ. प्रशांत परिचारक आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुंबईत बोलावून घेतले होते. राजेंद्र राऊत यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी टाकली आहे. त्यातूनच माढा तालुक्यातील शिंदे विरोधकांची राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेट घडवून आणल्यानंतर वाद आणखी चिघळला आहे. 

राऊत गेल्या काही दिवसांपासून करमाळा, माढा, सांगोला, मोहोळ, माण, खटाव तालुक्यातील महाआघाडीतील नेत्यांशी चर्चा करीत आहेत. या नेत्यांना ते महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या दरबारी घेऊन जात आहेत. 
माढा लोकसभा मतदारसंघात राजेंद्र राऊत यांनी घेतलेली भूमिका यामुळे संजय शिंदे आणि राजेंद्र राऊत यांच्यात फोनवरून यासंदर्भात बाचाबाची झाली. 

मुंबईतील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठका संपवून माजी आ. राजेंद्र राऊत हे बार्शीला परतत होते. मंगळवारी सायंकाळी ते पुण्यात मुक्कामी होते. सायंकाळपासून त्यांना संजय शिंदे यांचा फोन येत होता. पण राऊत त्यांचा फोन घेत नव्हते. रात्री पुन्हा फोन आल्यानंतर राऊत यांनी फोन घेतला. 

‘राजाभाउ माझी अडचण तुम्हाला माहीत आहे. माझा विरोध कुणाला आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुमचा गैरसमज होतोय. तुम्ही कशाला कुटाणे करता’, असे म्हणताच राजेंद्र राऊत संतापले. तुला जिल्ह्याचा नेता करण्यासाठी मी काय केलंय, कुणाचा विरोध घेतलाय हे सगळ््यांना माहीत आहे. मुख्यमंत्र्यासमोर आम्हाला तोंडघशी पाडले.

माणसाने किती गद्दारी करावी हे कळायला पाहिजे. आता जे राजकारण होईल ते समोरासमोर होईल, असे राऊत यांनी सुनावले. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या नावाने मला दमात घेऊ नका. मला पण संजय शिंदे म्हणतात, असे बोलल्याची चर्चा आहे. राजेंद्र राऊत यांनी मी कोणाच्या बापाला घाबरत नाही़ मी माझ्या पक्षाचे काम करतोय तुमच्यासारखी असली लय बघितल्यात.. माझा नाद करू नको, असे बोलल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे, राऊत यांनी सकाळी हा सर्व प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कानावर घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


माढ्यात राऊत यांच्या हस्तक्षेपामुळे वाढला वाद
राऊत यांनी करमाळ्याचे काँग्रेस नेते जयवंतराव जगताप यांना भाजपामध्ये आणण्यासाठी केलेल्या हालचाली असो की मंगळवारी माढ्यातील स्वाभिमानी आघाडीच्या नेत्यांची मुंबईत मुख्यमंत्र्यांबरोबर घडवून आणलेली भेट तसेच जिल्हा परिषदेचे सभापती विजयराज डोंगरे यांची भेट घडवून त्यांनी भाजपासाठी गोळाबेरीज करण्यास सुरुवात केली़ या सर्वांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाऊन त्यांचे मन वळविण्याकडे राऊत यांनी लक्ष घातले आहे.

Web Title: Language of 'beholds' between Sanjay Shinde and Rajendra Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.