चिक्केहळ्ळी जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 03:33 PM2019-07-01T15:33:24+5:302019-07-01T15:39:59+5:30
विद्यार्थ्यांनी केल्या तक्रारी; एकाही जबाबदार अधिकाºयांनी दिली नाही शाळेला भेट
अक्कलकोट : तालुक्यातील चिक्केहळ्ळी येथील जिल्हा परिषद शाळेतील खिचडीत अळ्या तरंगत असतानाही खिचडी बनवली गेली. वाटप करताना विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारी आणि पालकांनी वेळीच लक्ष घातल्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत ग्रामस्थांनी शिक्षण विभागाकडे तक्रार करूनही एकही जबाबदार अधिकाºयांनी भेट न दिल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
चिक्केहळ्ळीत जिल्हा परिषदेचे पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. शाळेत शंभरहून अधिक पटसंख्या आहे. शुक्रवार, २८ जून रोजी दुपारी ३ वाजता सुटी झाली. दरम्यान, खिचडीसाठी तांदूळ काढला गेला. त्यामध्ये अळ्या असल्याचे स्वयंपाकी महिला शीला बंदीछोडे आणि शोभा झळके यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक गुरुनाथ सुतार यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानंतरही खिचडी बनवली गेली. त्यानंतर विद्यार्थ्यांना वाटपही करण्यात आले़ मुलांनी अळ्या असल्याचा कांगावा करताच ग्रामस्थ व पालक राहुल माने, विजय सोमवंशी, काशिनाथ जोगदे, गुंडप्पा अरकेरी, शिवानंद देगील, श्रीशैल म्हैसलगी, गुंडप्पा पुजारी यांनी मुख्याध्यापक यांना जाब विचारला, परंतु मुख्याध्यापकांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रार केली. शिक्षण विभागाकडूनही या घटनेकडे दुर्लक्ष झाले. घटना घडून दोन दिवस लोटले तरी संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी शाळेला भेट देऊन चौकशी केली नाही.
-------------
फोन वाजला...पण उचलला नाही
याबाबत माहिती व म्हणणे घेण्यासाठी गटशिक्षणाधिकारी राजकुमार नागणसुरे व संबंधित मुख्याध्यापक गुरुनाथ सुतार यांना शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोबाईलवरून संपर्क साधला असता दोघांनीही कॉल घेतला नाही़
—-----------
शाळेत दररोज दिल्या जाणाºया खिचडीच्या तांदळात अळ्या तरंगत असताना स्वयंपाकी महिलांनी मुख्याध्यापक सुतार यांच्या लक्षात आणून दिले होते; मात्र त्यांनी त्याचे गांभीर्याने घेतले नाही़ त्याचाच भात बनवून विद्यार्थ्यांना देताना गोंधळ झाला.
- राहुल माने
ग्रामस्थ