उजनी धरणावर परराज्यातील लेसर फ्लेमिंगोची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 03:22 PM2019-02-06T15:22:10+5:302019-02-06T15:25:44+5:30
नासीर कबीर । करमाळा : यंदा उजनी पाणलोट क्षेत्रात विविध प्रकारच्या विदेशी पक्ष्यांनी हजारोंच्या संख्येने लांबवरुन स्थलांतर करून हिवाळा ...
नासीर कबीर ।
करमाळा : यंदा उजनी पाणलोट क्षेत्रात विविध प्रकारच्या विदेशी पक्ष्यांनी हजारोंच्या संख्येने लांबवरुन स्थलांतर करून हिवाळा सुरू होण्यापूर्वीच दाखल झाले होते. आता त्यांच्या परतीच्या प्रवासाला प्रारंभ होण्याच्या तयारीत असताना आफ्रिका खंडातून शेकडोंच्या संख्येने लेसर फ्लेमिंगो उजनी पाणलोट क्षेत्रावर येऊन दाखल झाले आहेत. ओडिशा, तामिळनाडू, राजस्थानमधील खाड्या या पक्ष्यांचे वास्तव्यस्थान आहे.
उजनीवर दरवर्षी न चुकता येणारे रोहित पक्षी हे ग्रेटर फ्लेमिंगो या प्रकारचे असतात. ते कच्छच्या रणातून येतात; मात्र पश्चिम आफ्रिकेत मूळ वास्तव्याला असलेले लेसर फ्लेमिंगो या प्रकारचे रोहित पक्षी प्रथमच यावर्षी येथे आले आहेत. चार वर्षांपूर्वी केवळ दोन लेसर फ्लेमिंगोची उजनीवर नोंद झाल्याची माहिती ही पक्षी अभ्यासक डॉ.अरविंद कुंभार यांनी दिली; मात्र यावर्षी दीडशेच्या घरात हे नवीन परदेशी पाहुणे करमाळा तालुक्यात उजनी लाभक्षेत्रातील कुंभारगाव, कोंढारचिंचोली, टाकळी या गावांच्या शिवारातील उजनी पाणपृष्ठावर ऐटीत विहार करताना आढळून आले आहेत. हे लेसर फ्लेमिंगो धरण निर्मितीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने येऊन इतिहास रचले आहेत.
उजनीसह जिल्ह्यातील इतर पाणवठ्यावर नेहमी येणाºया फ्लेमिंगोपेक्षा आकाराने लहान असलेले लेसर फ्लेमिंगो इतर गुणधर्मामध्येही भिन्न असतात. रंगाने हे पक्षी वरून गुलाबी मिश्रित सफेद तर पंखाचा खालचा आतील भाग गडद गुलाबी असतो. त्यांची चोच लहान आकाराची असून, ती आखूड व गर्द गुलाबी रंगाची असते. लेसर फ्लेमिंगोंना छोटा रोहित या नावानेही ओळखतात. लेसर फ्लेमिंगोंमधील खाद्य सवयी ग्रेटर फ्लेमिंगो सारखीच आहे. हे पक्षीदेखील वनस्पतींची अंकुर, शेवाळे, जलकीटक, मृदुकायी प्राणी इत्यादी खाद्य मटकवतात.
लेसर फ्लेमिंगोंना सागर किनारा व नद्यांच्या संगमाच्या परिसरातील खाड्यांमधील ‘ब्रॅकिश वॉटर’ वर विहार करायला आवडते. दरवर्षी हे थव्याच्या थवेने लिटिल कच्छच्या रणातून जुलै-आॅगष्टदरम्यान नवीन पिढीला जन्म घालून भारत भ्रमंतीला हिवाळी पाहुणे म्हणून निघतात व महाराष्ट्रातील मुंबई जवळच्या शिवडी व ठाणे परिसरातील खाड्यांमध्ये येऊन पुढील चार-पाच महिन्यांच्या वास्तव्याला येतात.
किनारपट्टी केली पार
- ओडिशामधील चिल्का या खाºया पाणीमिश्रित सरोवरात, तामिळनाडू राज्यातील पॉर्इंट कॅलीमेर खाडी तसेच राजस्थानमधील साल्ट लेक या ठिकाणीही हे पक्षी हजारोंच्या संख्येने येऊन दाखल होतात; मात्र यंदा किनारपट्टी पार करून भूभागातील उजनीपर्यंत मजल मारून हे पक्षी बहुसंख्येने आल्याने पक्षी अभ्यासक चकित झाले आहेत. ग्रेटर फ्लेमिंगोंच्या सहवासात लेसर फ्लेमिंगो मोठ्या संख्येने उजनीवर आल्यामुळे तेथील पक्षी वैभवात भर पडली असून पक्षी निरीक्षक सुखावले आहेत.