इस्लामपूर चौक ते भांबुर्डी रस्ता मोजतोय शेवटच्या घटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:24 AM2021-05-27T04:24:01+5:302021-05-27T04:24:01+5:30
माळशिरस : तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याची यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, प्रचंड ...
माळशिरस : तालुक्याच्या पश्चिम भागाला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी काही दिवसांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याची यादीही प्रसिद्ध झाली. मात्र, प्रचंड मोठे पडलेले खड्डे, दुतर्फा दोन्ही बाजूने वाढलेली काटेरी झुडपे, पश्चिम पट्ट्यातील गावांचा दुवा असलेल्या इस्लामपूर चौक ते भांबुर्डी या ४-५ किलोमीटर रस्त्याकडे मात्र दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
माळशिरस तालुक्यातील भांब, गिरवी, कन्हेर, सरगरवाडी, इस्लामपूर, माणकी यासह काही गावातील ग्रामस्थांना अत्यावश्यक सेवेसाठी हा रस्ता प्रमुख दुवा आहे. मात्र, हा रस्ता सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. या रस्त्याने मोठी रहदारी सुरू आहे. सध्या तालुक्यातील विविध रस्त्यांना दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी अद्यापही निधीची प्रतीक्षा करावी लागत आहे.
कोट ::::::::::::::::
याच रस्त्याने देशाचे नेते, पालकमंत्री, आरोग्यमंत्री यांनी कन्हेर गावाचा दौरा केला. शिवाय तालुक्यात दोन आमदार व खासदार यांनाही या भागातून मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त होईल, अशी आशा होती. शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाहतुकीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे, तरीही या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
- बाळासाहेब सरगर
जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा