गावकारभाऱ्यांचा मनधरणीचा शेवटचा प्रयोग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:18 AM2021-01-02T04:18:45+5:302021-01-02T04:18:45+5:30
तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींत महाळूंग ग्रामपंचायत वगळता ५ गावांत १७, ३ गावांत १५, एका गावात १३, १६ गावांत ११, १७ ...
तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींत महाळूंग ग्रामपंचायत वगळता ५ गावांत १७, ३ गावांत १५, एका गावात १३, १६ गावांत ११, १७ गावांत ९, ६ गावांत ७ अशा ४८ गावांतील १८३ वॉर्डांतून ५१४ सदस्य ग्रामपंचायतीवर जाणार आहेत. या टप्प्यात १,८९१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ४० अवैध ठरल्यामुळे आता ग्रामपंचायत मैदानात १,८५१ अर्ज आहेत. अर्ज माघार घेण्यासाठी अवधी असल्यामुळे गावागावांत शेवटच्या टप्प्यात मनधरणीचा प्रयोग सुरू आहे.
तालुक्यातील बहुतांश गावांत दुरंगी लढती होत आहेत. मात्र काही गावांत तिरंगी अथवा बिनविरोध लढतीचे संकेत असल्यामुळे गावकारभारी सध्या गावगाड्यातील असंतुष्टांची मनधरणी करण्यात व्यस्त आहेत. यामध्ये साम, दाम, दंड या सूत्राबरोबरच विकास सोसायटी, शाळा व्यवस्थापन समिती, तंटामुक्ती समिती, वन समिती, सरपंच व उपसरपंच पदाची विभागणी, तर काही गावांत सदस्यांच्या कार्यकालाची विभागणी करून गावगाड्याच्या राजकारणातील बांधणी करून मेळ घालण्याचा शेवटचा प्रयत्न करताना दिसत आहेत.