गतवर्षी सोलापूर जिल्ह्याला मिळाले होते ५६ कोटी रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:14+5:302020-12-09T04:18:14+5:30
सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असले तरी यंदा पंतप्रधान विमा योजनेचा लाभ ...
सोलापूर : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असले तरी यंदा पंतप्रधान विमा योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळणार नाही. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. गतवर्षी जिल्ह्याला विमा योजनेचे ५६ कोटी रुपये मिळाले होते.
शासनाने येत्या तीन वर्षांसाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जाहीर केली आहे. डाळिंब, चिकू, पेरू, संत्रा, लिंबू या फळ पिकासाठी नवीन निकष निश्चित करण्यात केले आहेत. विशेषत: सोलापूर जिल्ह्यात ४१ हजार हेक्टरपेक्षा अधिक डाळिंबाचे क्षेत्र आहे . मृग बहारमध्ये डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील डाळिंबाच्या बागांचे नुकसान झाले आहे. जवळपास २५ हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र बाधित झाले आहे. अशा स्थितीत सरकारच्या विमा योजनेचा शेतकऱ्यांना आधार वाटत होता. मात्र नवीन निकषाचा उत्पादकांना फटका बसणार आहे. त्यांना नुकसानभरपाईसाठी दावाच करता येणार नाही.
मागील वर्षी दुष्काळामुळे डाळिंब बागा अडचणीत सापडल्या. पावसाचा खंड हा निकष समाविष्ट असल्याने जिल्ह्यातील २४ हजार ६२५ शेतकऱ्यांना ५६ कोटी रुपये विमा मंजूर झाला होता. यंदा शासनानेच योजनेचे निकष (ट्रिगर ) बदलल्यामुळे विमा कंपन्यांनी हात वर केले आहेत. या बदलाचा सर्वाधिक फटका पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांना बसणार आहे.
---------
निकषांचा फेरविचार करा : जिल्हाधिकारी
सोलापूर जिल्ह्यात डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. येथील डाळिंब जगाच्या बाजारपेठेत विकला जातो. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बागांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडतो, याकडे शासनाचे लक्ष वेधत सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नव्याने तीन वर्षांसाठी जाहीर केलेल्या फळपीक विमा योजनेच्या निकषांचा फेरविचार व्हावा, असे पत्र राज्याच्या कृषी आयुक्तांना दिले आहे.
--------
राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी स्वतः नव्या पीक विमा योजनेच्या निकषासंदर्भात बोललो आहे. जुने निकष आणि नवीन याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी शंभरकर साहेबांनी यासंदर्भात कृषी आयुक्तांशी पत्रव्यवहारही केला आहे.
- रवींद्र माने , प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर