स्व. बाळासाहेब ठाकरे सुधारित उपसा सिंचन योजना सांगोला या नावासाठी शासनाकडे केला पत्रव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:43+5:302021-09-06T04:26:43+5:30
उजनी धरणावर आधारित सांगोला तालुका उपसा सिंचन योजनेच्या वंचित १४ गावांचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभ आमदार शहाजीबापू पाटील व ...
उजनी धरणावर आधारित सांगोला तालुका उपसा सिंचन योजनेच्या वंचित १४ गावांचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभ आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांच्या हस्ते लोटेवाडी (ता. सांगोला) येथे झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे नेते भाऊसाहेब रुपनर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, प्रा. संजय देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत घाडगे, शहरप्रमुख कमरुद्दीन खतीब, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भोरे, पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, राजेंद्र मेटकरी, सदस्या रूपाली लवटे, वंदना गायकवाड, गुंडा खटकाळे, समीर पाटील, दादासाहेब लवटे, विजय पाटील यांच्यासह १४ गावांतील शेतकरी, महिला व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी सांगोला तालुक्यासाठी टेंभू, म्हैसाळच्या शेतीला पाणी दिले. शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून जनतेला पिण्यासाठी पाणी दिले. नीरा उजवा कालवा योजनेला १४४ कोटीचा ठेका दिला. या योजनेच्या कामासाठी सुमारे ६५० कोटी खर्च अपेक्षित असून, शासनाकडून तातडीने मंजुरी व निधी मिळवून वंचित १२ ते १४ गावांना पाणी देण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. उजनीचे पाणी सांगोला तालुक्याला देण्याचा महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला आहे, तो आम्ही पूर्णत्त्वास नेणार असल्याचे आश्वासन आ. शहाजीबापू पाटील यांनी दिले.
एकही गाव वंचित राहणार नाही : साळुंखे-पाटील
सांगोला तालुक्याच्या इतिहासात नोंद करावा, अशा सांगोला उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. यानिमित्ताने ३० वर्षांपूर्वी कै. काकासाहेब साळुंखे-पाटील यांनी स्वप्न पाहिले होते ते आज खऱ्या अर्थाने मनाला आनंद होत आहे. आम्ही दोघे खांद्याला खांदा लावून ही योजना पूर्णत्वास घेऊन जाणार आहोत. तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही, अशी भूमिका घेऊन काम करणार असल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी सांगितले.
भर पावसात सवाद्य मिरवणूक
प्रारंभी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांचे कार्यक्रमस्थळी भर पावसात जंगी स्वागत करुन उभयतांची रथातून सवाद्य मिरवणूक काढून फटाके फोडण्यात आले. यावेळी महिलांनी दोघांचे औक्षण करून संयोजकांच्या वतीने सत्कार केला. आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांनी भर पावसात व्यासपीठावर उभे राहून आपले मनोगत व्यक्त केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.
फोटो ओळ ::::::::::::::::::
उजनी धरणावर आधारित असलेल्या सांगोला तालुका उपसा सिंचन योजनेचा ड्रोन कॅमेराद्वारे सर्वेक्षणाचा शुभारंभ करताना आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.