'मी आत्महत्या करते' असा फोन करत लातूरच्या ॲडिशनल सीईओच्या पत्नीची हॉटेलमध्ये आत्महत्या
By रूपेश हेळवे | Published: November 28, 2022 05:22 AM2022-11-28T05:22:51+5:302022-11-28T05:24:16+5:30
स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते.
रुपेश हेळवे / सोलाूपर
सोलापूर : मुलाच्या लग्नाचा बस्ता खरेदी करण्यासाठी आलेल्या लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने रविवारी हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहलता प्रभू जाधव ( वय ४५, रा. लातूर) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्या पूर्वी त्यांनी नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले.
स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे १८ डिसेंबर लग्न रोजी होते. लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती व नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमीत्त लातूरला गेले. दुपारी स्नेहलता यांनी आपल्या लातूर मधील नातेवाईकाला फोन करत जोरजोराने रडत आपण 'आत्महत्या करणार' असे सांगू लागल्या. यामुळे नातेवाईकांनी समजून सांगत या घटनेची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली. जेमतेम दहा ते पंधरा मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर गेल्यानंतर हॉटेलचा दरवाजा बंद आढळला. यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना लगेच उपचारासाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. त्यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, रात्री विजापूर नाक्याचे विलास घुगे, विशाल जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. घटनेचा अधिक तपास विलास घुगे करत आहेत. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा झाली आहे.