अकलूज येथे रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:20+5:302021-01-23T04:22:20+5:30
सडक सुरक्षा, जीवन रक्षा, हे घोष वाक्य घेऊन राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून सन २०२१ मध्ये १८ जानेवारी ते ...
सडक सुरक्षा, जीवन रक्षा, हे घोष वाक्य घेऊन राज्य शासनाच्या परिवहन विभागाकडून सन २०२१ मध्ये १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी दरम्यान ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ते वाहतुकीच्या नियमांचे फलक वाहनावर लावून जनजागृती करीत वाहनांची रॅली काढली. तसेच रोटरी क्लब अकलूज व रोटरी क्लब सराटी डिलाईटच्या सहकार्याने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
प्रारंभी मोटेवाडी ते उपप्रादेशिक परिवहन कार्यालय शंकरनगर-अकलूज दरम्यान दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनासह जड वाहनांच्या रॅलीस उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी वाहतूक निरीक्षक संदीप मुरकुटे, अश्विन पोंदकुळे, सहा. पूनम पोळ उपस्थित होते.
रॅलीत वाहनांवर हेल्मेट तुमच्यासाठी सुरक्षा कुटुंबासाठी, मद्यप्राशन करून वाहन चालविणे म्हणजे आत्महत्यासारखेच, वाहन चालविताना मोबाईल वापर टाळा, वाहतुकीची शिस्त पाळा, अपघात टाळा अशा आशयांचे फलक लावून जनजागृती करीत रॅली काढली. रॅलीच्या सांगताप्रसंगी वाहन चालकांनी रस्ते वाहतूक सुरक्षिततेची शपथ घेतली.
याप्रसंगी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष डाॅ. बाहुबली दोशी, डाॅ. संतोष दोशी, डाॅ. राजेश चंकेश्वरा, रोटरी क्लब सराटीचे अध्यक्ष नितीन दोशी, माजी अध्यक्ष स्वप्निल शहा, नितीन कुदळे, आशिष गांधी, स.म. शंकरराव मोहिते पाटील ब्लड बॅकेचे मयूर माने व त्यांचे सहकारी उपस्थित होते.