युवा महोत्सवात भजन, भारुड, पोवाडा, कव्वालीबरोबर लावणीही रंगणार; सहा भारतीय लोककलांचा समावेश!
By संताजी शिंदे | Published: September 14, 2023 07:05 PM2023-09-14T19:05:21+5:302023-09-14T19:05:34+5:30
युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आतिश बनसोडे यांनी के
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यंदाच्या १९ व्या युवा महोत्सवात, सहा नवीन भारतीय लोककलांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केली. यामध्ये भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या लोककला प्रकारांचा समावेश आहे.
युवा महोत्सवामध्ये भारतीय लोककला प्रकारांचा समावेश करण्याची मागणी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आतिश बनसोडे यांनी केली होती. या अनुषंगाने गुरुवारी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी युवा महोत्सवात समावेश असलेल्या विविध कला प्रकारांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणात समाविष्ट असलेल्या विविध बाबींचा विचार करून भारतीय लोककला व संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी नव्याने भजन, भारुड, पोवाडा, शाहिरी जलसा, कव्वाली आणि लावणी या कलाप्रकारांचा समावेश करण्याची घोषणा केली. यातील काही कलाप्रकार युवा महोत्सवात होते, मात्र मागील सहा वर्षांपासून युवा महोत्सवातून वगळण्यात आले होते. त्यामुळे आता युवा महोत्सवात कला प्रकारांची संख्या वाढली आहे.
युवा महोत्सवात ३९ कलाप्रकार
- यंदाचा युवा महोत्सव हा दि. १० ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान पंढरपूर येथील श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय (स्वेरी कॉलेज) येथे रंगणार आहे.
- संलग्नित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवाची तयारी सुरू केली आहे. आता नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या या नवीन सहा कला प्रकारामुळे संख्या ३९ वर गेली आहे. नवीन कला प्रकारांची तयारीही विद्यार्थ्यांनी करावी, असे आवाहन प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले आहे.