सासुरे ग्रामस्थांचा युवकांच्या कारभारावरच विश्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:48 AM2021-02-05T06:48:27+5:302021-02-05T06:48:27+5:30
येथील सरपंचपदासाठी सर्वसाधारण पुरुष वर्गाचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे रामभाऊ आवारे व तात्यासाहेब करंडे हे प्रबळ दावेदार असले तरी ...
येथील सरपंचपदासाठी सर्वसाधारण पुरुष वर्गाचे आरक्षण निघाले आहे. त्यामुळे रामभाऊ आवारे व तात्यासाहेब करंडे हे प्रबळ दावेदार असले तरी बाळासाहेब पाटीलही इच्छुक आहेत.
गेल्या पाच वर्षात रामभाऊ आवारे यांनी स्वमालकीच्या बोअरमधून गावाला मोफत पाणी दिले. तर तात्यासाहेब करंडे यांचा मनमिळावू स्वभाव, काम करण्याची हातोटी यामुळे त्यांनाच ग्रामस्थांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दोघापैकी कोणीही सरपंच झाले तरी सर्वांना सोबत घेऊन कार्य करतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
कारण गत निवडणुकीत सासुरे येथे तात्या करंडे, रामभाऊ आवारे, प्रशांत भारती, बाळासाहेब पाटील, विवेक ताकभाते, पांडुरंग करंडे, श्रीकांत भारती, सुनील पाटील, पांडुरंग करंडे यांनी गावाचा पारदर्शी कारभार करून दर महिन्याला चावडीवर जमाखर्चाचा हिशेब मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी रुग्णवाहिकेसह सुमारे दोन कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्र तयार केले. गावात सर्वत्र सिमेंट रस्ते व भुयारी गटार व्यवस्था केली. त्यांना येणाऱ्या मानधनातुन गावात वृक्षारोपण करून त्यास संरक्षक जाळी बसवली. स्वच्छता, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करून दिले. याचा परिणाम म्हणून सासुरे मतदारांनी पुन्हा याच युवकांना गावगाडा हाकण्याची दिली.
पाटोद्याच्या धर्तीवर ग्रामस्थांना पिठाची चक्की व अल्प दरात शुद्ध पाणी देण्याचा आमचा मानस असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत पाटील व बाळासाहेब भारती यांनी दिली.