लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा हवा, सोलापूरातील धर्मजागृती सभेत आमदार राजासिंह ठाकूर यांचे मत, सोलापुरात हिंदूंनी जागवली हिंदुत्त्वाची ज्योत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:58 PM2018-02-08T12:58:57+5:302018-02-08T13:01:19+5:30
सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : सध्या अन्य धर्मियात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ती अशीच वाढत राहिल्यास समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी या लोकसंख्येला नियंत्रणात आणण्यासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ करण्याची आवश्यकता आहे. धर्मांतरण रोखण्यासाठी हिंदंूनी संघटित होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी सोलापुरात केले.
हिंदू जनजागृती समितीच्या वतीने येथील पुंजाल क्रीडांगणावर आयोजित हिंदू धर्मजागृती सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी सनातन संस्थेच्या स्वाती खाडये, समितीचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मनोज खाडये आणि हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर उपस्थित होते.
आपल्या भाषणातून आमदार ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा असूनही मोठ्या प्रमाणात गोहत्या होत आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घ्यावी. धर्मासाठी जातपात विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. अखंड हिंदुस्तान निर्माण होण्यासाठी प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन सिद्ध व्हायला हवे. देश पुढे जाण्यासाठी धर्म सुरक्षित राहायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली. सद्गुरु यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यासारख्या विरांच्या परंपरांचा अभिमान प्रत्येक भारतीयांना आहे; मात्र त्यांना शौर्यहीन बनवण्याचे षड्यंत्र चालू आहे. देशात प्रत्येक १४ मिनिटांनी एक बलात्कार आणि प्रत्येक २४ मिनिटांनी एका महिलेचा लैंगिक छळ होतो. हे रोखण्यासाठी प्रत्येक युवा-युवतींनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे, असे आवाहन केले.
मनोज खाडये म्हणाले, सध्या काही हिंदू प्रलोभनाला बळी पडून धर्मांतर करत आहेत, हे दुर्दैवी आहे. यामुळे धर्मांतर बंदीचा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे. धर्मसभेला पोलिसांनी बंदोबस्त दिला, हे चांगले असून त्यांनी हाच बंदोबस्त आतंकवादी बनण्याच्या ठिकाणी पुरवायला हवा होता अशी अपेक्षा व्यक्त केली.
सभेचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. दीपप्रज्वलनानंतर वेणूगोपाल जिल्ला पंतलु, भानुचंद्र चिप्पा, व्यंकटेश श्रीमल, श्रीनिवास जिल्ला यांनी वेद मंत्रपठण केले. सभेचे सूत्रसंचालन अभिजित देशमुख आणि संजय इंगळे यांनी केले. या सभेसाठी पुंजाल मैदानावर मोठ्या संख्येने हिंदू बांधवांनी हजेरी लावली.
------------------------
सुराज्य अभियानात सहभागी व्हा!
- गेली ७० वर्षे देशाचा विकास करु असे सांगून विविध राजकीय पक्षांनी राज्य केले, मात्र आजपर्यंत देशातील दारिद्र्य, शेतकºयांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, बेरोजगारी या समस्या सुटल्या नाहीत. या देशातील भ्रष्ट आणि शोषक प्रवृत्ती वाढल्याने जनतेला छोट्या छोट्या गोष्टींसाठी आंदोलन करावे लागते. त्याविरुद्ध आपण उभे राहायला हवे. या लोकशाहीत प्रबळ झालेल्या दुष्प्रवृत्तींना रोखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ आरंभले आहे, त्यात सहभागी होण्याचे आवाहन मनोज खाडये यांनी केले.