हल्ल्याच्या निषेधार्थ न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून वकीलांनी केला निषेध
By संताजी शिंदे | Published: February 13, 2024 07:17 PM2024-02-13T19:17:31+5:302024-02-13T19:18:24+5:30
हल्ला प्रकरणी चौघांविरूद्ध भादवी कलम ३२७, ४२७, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शी: पंढरपूर येथील वकील संघाचे सदस्य ॲड. पंकज हातगिने (रा.जैनवाडी ता.पंढरपूर) यांची गाडी आडवून, शिवीगाळ करीत त्यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी बार्शी वकील संघाच्या वतीने न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहून निषेध केला. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी पक्षकाराने त्यांची गाडी अडवून ॲड. पंकज हातगिने यांच्यावर हल्ला केला. त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.
या घटनेनंतर पंढरपूर अधिवक्ता संघाचे पदाधिकारी व अनेक सदस्यांनी ग्रामीण पोलिस स्टेशन, पंढरपूर धाव घेतली. त्या नंतर चार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांच्या अटकेची मागणी केली. या घटनेमुळे वकीलावरील अन्याय, हत्या अत्याचार, प्राणघातक हल्ले यास प्रतिबंध करण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर होणे गरजेचे असल्याची मागणी बार्शी वकील संघाचे अध्यक्ष काकासाहेब गुंड यांनी तातडीच्या बैठकीत केली. हल्ल्याचा निषेध नोंदवून मंगळवारी न्यायालयीन कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय जाहीर केला.
हल्ला प्रकरणी चौघांविरूद्ध भादवी कलम ३२७, ४२७, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या घटने बाबत योग्य तो विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येणार आहे. तरी पंढरपूर अधिवक्ता संघातील सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.