नेत्यांकडून कोल्हापूरची उपेक्षाच

By admin | Published: December 24, 2015 12:23 AM2015-12-24T00:23:27+5:302015-12-24T00:32:33+5:30

हाती आरक्षण केंद्रच : ‘एमटीडीसी’चे उपप्रादेशिक कार्यालय सोलापूरला

Leaders of Kolhapur leaders | नेत्यांकडून कोल्हापूरची उपेक्षाच

नेत्यांकडून कोल्हापूरची उपेक्षाच

Next

कोल्हापूर : पर्यटनवाढीच्या दृष्टीने कोल्हापूरलाच महत्त्व आहे; पण राजकीय नेत्यांच्या उदासीनतेमुळे पंधरा वर्षांपूर्वी कोल्हापुरातून बंद केलेले महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) प्रादेशिक कार्यालय पुन्हा सुरू होण्याच्या आशा मावळल्या आहेत. कारण आता नवीन उपप्रादेशिक कार्यालय सोलापूरला सुरू करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात असून मंजुरीची औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे कोल्हापूरला फक्त आरक्षण केंद्रावरच समाधान मानावे लागणार आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या अखत्यारीत सोलापूरला नवीन उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. पर्यटनाच्या दृष्टीने कोल्हापूर हे परिपूर्ण असतानाही येथील ‘एमटीडीसी’चे प्रादेशिक कार्यालय पंधरा वर्षांपूर्वी अचानक बंद केले. त्यावेळेपासून हे कार्यालय पूर्ववत सुरू करण्याबाबत शहरात आंदोलने झाली; पण त्यासाठी राजकीय नेत्यांनी फक्त निवेदन स्वीकारणे व आश्वासन देण्यापेक्षा जादा काहीही काम केले नाही.
गेल्याच महिन्यात पर्यटन वाढविण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी पालकमंत्र्यांसोबत झालेल्या पर्यटन विभागाच्या बैठकीत यंदा पर्यटन महोत्सव घेण्याचे नियोजन सुरू केले आहे. हा पर्यटन महोत्सव कोल्हापूरच्याच नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्मरणात राहील असा करावा, अशा सूचना चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या होत्या. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना व निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले होते; पण आता उपप्रादेशिक कार्यालय सुरू करण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या स्वप्नावर पुन्हा पाणी फिरले आहे.
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कोल्हापुरात मोठा वाव आहे. श्री अंबाबाईचे मंदिर अशा अनेक धार्मिक स्थळांसह अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यामुळे कोल्हापूरला प्रादेशिक कार्यालयाची अत्यंत आवश्यकता आहे; पण त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. या मागणीसाठी आजही राजकीय नेत्यांनी जोर लावल्यास हे प्रादेशिक कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात उद्योग भवनमध्ये सुरू असलेले ‘एमटीडीसी’चे हे कार्यालय फक्त माहिती व आरक्षण केंद्र आहे. तेथे दरवर्षी आरक्षणातून अवघे १२ लाख रुपये जमा होतात. (प्रतिनिधी)


पर्यटन महोत्सव अन् पालकमंत्र्यांसमोर आव्हान
कोल्हापुरातील पर्यटन महोत्सवासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले होते. त्याचवेळी पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला सोलापूर येथे उपप्रादेशिक कार्यालय प्रास्तावित करण्यात आल्याचे पत्र दिले. त्यामुळे हे प्रादेशिक कार्यालय पुन्हा कोल्हापुरात सुरू करण्याचे मोठे आव्हान पालकमंत्री पाटील यांच्यासमोर आहे.

Web Title: Leaders of Kolhapur leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.