जिल्ह्यात ग्रामपंचायतीतून घडले तिघांचे नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:23 AM2021-01-03T04:23:17+5:302021-01-03T04:23:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एकच धुरळा उडाला आहे. अनेकांना गावकारभारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेक ...

The leadership of the three happened from the Gram Panchayat in the district | जिल्ह्यात ग्रामपंचायतीतून घडले तिघांचे नेतृत्व

जिल्ह्यात ग्रामपंचायतीतून घडले तिघांचे नेतृत्व

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून एकच धुरळा उडाला आहे. अनेकांना गावकारभारी होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. अनेक युक्त्या-प्रयुक्त्या लढवल्या जात आहेत.

यापूर्वीही जिल्ह्यात अनेकांचे नेतृत्व बहरले आहे. अकलूजचे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा ग्रामपंचायतीचे सरपंच, आमदार, खासदार, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री हा प्रवास थक्क करणारा आहे.

स्व. आनंदराव देवकते यांनी सरपंचपदापासून सुरू केलेला प्रवास मंत्रिपदापर्यंत नेला. करमाळ्याचे स्व. दिगंबरराव बागल यांनी मांगी गावातून सुरू केलेला प्रवास मंत्रिपदापर्यंत पोहोचला. या काळात त्यांनी तालुक्यात कारखान्याच्या रूपाने सहकार क्षेत्राचे जाळे विणले.

अशी आणखीही आमदारपदापर्यंतचा प्रवास करणाऱ्यांमध्ये माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूद्वयांनी सरपंचपदापासून राजकारणात प्रवेश केला. पुढे पंचायत समिती, बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद अशी मुसाफिरी केली. साखर कारखान्याच्या रूपाने नंदनवन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

गावपातळीवर काम करून चुणूक दाखविण्याची संधी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमधून मिळते. गावपातळीपासून केलेला संघर्ष आणि नेतृत्व यातून तावून सुुलाखून निघण्याची हीच ती संधी असते.

सध्या ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येकाचा जो आटापिटा चालला आहे, तो याचसाठी म्हणावा लागेल.

——————————————————————-

असे घडले नेतृत्व

विजयसिंह मोहिते-पाटील

गावपातळी ते राज्य पातळीवर राजकीय जीवनाची यशस्वी वाटचाल करणारे विजयसिंह मोहिते-पाटील यांची राजकीय कारकीर्द १९६९ साली स्थानिक स्वराज्य संस्थेपासून सुरू झाली. अकलूज ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड होऊन ते सरपंचपदी आरूढ झाले. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, १९८० साली माळशिरस विधानसभा मतदारसंघातून प्रथमच आमदार झाले. पुढे उपमुख्यमंत्र्यांपासून विविध खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला.

————————-

स्व. दिगंबरराव बागल

मांगी (ता. करमाळा) या गावचे सलग दहा वर्षे सरपंचपद भूषविलेले स्व. दिगंबरराव बागल जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सभापती बनले. त्यानंतर दोन टर्म आमदार व थेट राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कोणताही राजकीय वारसा नसताना प्रतिकूल परस्थितीमध्ये मांगी गावचे दोनवेळा सरपंचपद उपभोगले. दुसऱ्या टर्ममध्ये २००० ते २००४ कालावधीमध्ये आमदार व राज्याच्या मंत्रिमंडळात सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. तालुक्यातील पश्चिम भागात अतिरिक्त उसाच्या गाळपाचा प्रश्न सोडविण्यासाठी अवघ्या आठ महिन्यांत मकाई सह. साखर कारखान्याची उभारणी केली. २००५ मध्ये दिगंबरराव बागल यांचे निधन झाले.

————

स्व. आनंदराव देवकते

दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या राजूरसारख्या छोट्या गावातून सरपंचपदाची निवडणूक लढवून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर उपसभापती, आमदार, राज्य भू-विकास बँकेचे अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री अशी विविध पदे त्यांनी भूषवली. गावाची नाळ मात्र त्यांनी अखेरपर्यंत तुटू दिली नाही. तब्बल ३५ वर्षे ते राजकारणात टिकून राहिले. त्यामागे राजकारणातील ग्रामपंचायतीच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता. २०१८ मध्ये त्यांचे निधन झाले.

——————-

महाराष्ट्रातला ५० टक्के भाग ग्रामपंचायतींवर अवलंबून

ग्रामीण महाराष्ट्रात ५० टक्के भाग हा ग्रामपंचायतींवर अवलंबून आहे. राज्यातील ४३ हजार खेड्यांचा कारभार हा २८ हजार सरपंच पाहतात. ग्रामीण भागातील आर्थिक जडणघडण ही देशाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत तरुण व उच्च शिक्षितांचा सहभाग बघता महाराष्ट्राचे भवितव्य भविष्यात अधिक उत्कृष्ट असेल असे मला वाटते, असे मत अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

--------

Web Title: The leadership of the three happened from the Gram Panchayat in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.