आघाडीची सत्ता येणार

By Admin | Published: July 12, 2014 12:08 AM2014-07-12T00:08:15+5:302014-07-12T00:08:15+5:30

काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रच राहणार : जितेंद्र आव्हाड यांचा विश्वास

The leading power will come | आघाडीची सत्ता येणार

आघाडीची सत्ता येणार

googlenewsNext

 

सोलापूर: येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदिलाने लढतील, आजवरची राज्यातील भरीव विकासकामे पाहता पुन्हा आघाडीची सत्ता स्थापन होईल, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय व फलोत्पादन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानिमित्त शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या वार्तालापप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश गादेकर, दिनेश शिंदे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, नगरसेवक दीपक राजगे, महेश निकंबे आदी उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत मोदींची लाट होती, आता ती राहिली नाही. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ही लाट राहणार नाही. कोणतीही लाट जास्त काळ राहत नाही, बदल हा निसर्गाचा नियम आहे. मुंबईतील विविध उड्डाण पुले, मेट्रो रेल्वे आदी माणसांच्या जीवनमानावर परिणाम करणारी अनेक विकासात्मक कामे झाली आहेत. राज्यात, अन्य जिल्ह्यांतही अनेक विकासात्मक कामे झाल्याने जनता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनेच राहिल.
वैद्यकीय क्षेत्रातील परीक्षांसंदर्भात बोलताना आव्हाड यांनी सांगितले की, निकालानंतर फेरतपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या पेपरचे निकाल अवघ्या १५ दिवसांत दिले पाहिजेत, असा आदेश आपण विद्यापीठाला दिला आहे. फलोत्पादनसंदर्भात बोलताना आव्हाड म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब, चिकू आदी फळांचे उत्पादन देशात नंबर १ वर आहे. या उत्पादनांची म्हणावी तशी मार्केटिंग करता आली नाही, अशी खंत व्यक्त करीत आव्हाड यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी फळ उत्पादनाला वाव देणार असल्याचे सांगितले.
-------------------
आव्हाड म्हणाले...
राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वांना विश्वासात घेऊन चालणारा पक्ष आहे. पक्षाचा मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री निवडून आलेल्या लोकांकडूनच त्यांची निवड केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सामूहिक नेतृत्व असलेला पक्ष आहे.
पक्षांतर करून काही नेते इकडे तिकडे जाण्याची तयारी करीत आहेत असे विचारले असता आव्हाड म्हणाले की, ज्यांना संधी आहे असे वाटते ते तिथे जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्यातरी कोणाला घेण्यासाठी जागा नाही.
नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येतील खऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे. तपास जरी संथ गतीने वाटत असला तरी यातील खरे आरोपी पकडले जातील. त्यामुळे सत्य बाहेर येणार आहे.

Web Title: The leading power will come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.