उजनी पाईपलाईनला गळती; सोलापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 01:24 PM2019-06-18T13:24:44+5:302019-06-18T14:11:26+5:30
दुष्काळात तेरावा महिना; टेंभुर्णी बायपासजवळील वेणेगावच्या पुढे मोठी गळती
सोलापूर : शहराला पाणी पुरवठा करणाºया उजनी ते सोलापूर पाईप लाईनला सोमवारी सायंकाळी टेंभुर्णी बायपासजवळील वेणेगावच्या पुढे मोठी गळती लागली. यामुळे मंगळवारी आणि बुधवारी शहराच्या बहुतांश भागातील पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे.
मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाºयांनी सोमवारी सायंकाळी उजनी पाईप लाईनला गळती लागल्याचे समजले. सायंकाळी सहाच्या सुमाराला तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरुस्तीसाठी उजनी पंपगृहातील पंप बंद करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम चालणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उजनी पंपगृहातील पंप चालू करण्यात येतील. त्यामुळे पाकणी केंद्रात पाणी येण्यास उशीर होईल.
उजनी पाईप लाईनवर आणि भवानी पेठ जलशुध्दीकरण केंद्रावर अवलंबून असलेल्या परिसराचा मंगळवारी आणि बुधवारी होणारा पाणी पुरवठा उशिरा होणार आहे. दरम्यान, उजनी पाईप लाईनला गळती लागल्यामुळे वेणेगावजवळ पाण्याचे तळे साचले होते. शहरात पाणी टंचाई आहे. चार दिवसाआड पाणी पुरवठा होतोय. उजनीतून तिबार पंपिंग करुन पाणी उपसा करण्यात येत आहे. या परिस्थितीत हजारो लिटर पाणी वाया गेले.
औज बंधाºयात पाणी आल्यानंतर शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला होता. परंतु, उजनी पाईप लाईनला लागलेल्या गळतीमुळे दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.