जाणून घ्या...; किती कोटीची आहे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची मालमत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 03:33 PM2019-04-04T15:33:32+5:302019-04-04T15:36:04+5:30
राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता २0 कोटी ३२ लाख तर जंगम मालमत्ता ३६ कोटी ४३ लाखांची आहे.
सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेली स्थावर मालमत्ता २0 कोटी ३२ लाख तर जंगम मालमत्ता ३६ कोटी ४३ लाखांची आहे. गेल्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा विचार करता चालू वर्षी देशमुख यांच्या उत्पन्नात घट झाली आहे.
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी माढा लोकसभा मतदार संघासाठी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्राद्वारे मालमत्तेचे विवरण दिलेले आहे. त्यामध्ये देशमुख यांच्या कुटुंबीयांचे चालू वर्षाचे उत्पन्न ७0 लाख ९८ हजार दाखविण्यात आले आहे. सन २0१३-१४ मध्ये त्यांच्या कुटुंबीयांचे उत्पन्न २ कोटी ३८ लाख ८९ हजार होते. पाच वर्षात त्यांच्या उत्पन्नात १ कोटी ६७ लाखांनी घट झालेली आहे. सन २0१३-१४ मध्ये पत्नी स्मिता यांच्या नावे उत्पन्न २५ लाख ८ हजार ५0 रुपये होते ते चालू वर्षी फक्त ४ हजार ३६६ इतके दाखविण्यात आले आहे.
स्थावर मालमत्तेमध्ये देशमुख यांच्या नावे सह्याद्रीनगर व होटगी रोडवरील काडादी प्लॉटमध्ये घर आहे. तर मुलगा रोहन यांच्या नावे कोंडी येथे शेती, स्वत: व पत्नीच्या नावे भंडारकवठे, शिरापूर, वडाळा, लांबोटी, बीबीदारफळ येथे शेती आहे.
या शिवाय लोकमंगल ग्रुप, मनोरमा बँक, नॅचरल शुगर, सोलापूर अॅग्रो, ठाणे जनता बँक, सोलापूर औद्योगिक बँक, लक्ष्मी बँकेचे शेअर्स आहेत व विविध बँकांत ठेवी आहेत.. स्वत:च्या नावे ७५ हजार, पत्नीच्या नावे एक लाख ३ हजार, मुलाच्या नावे ४२ हजार रोकड आहे.
याशिवाय तिघांच्या नावे विविध बँकांमध्ये ठेवी आहेत. याशिवाय महापालिकेची १ कोटी १ लाख ८१ हजार इतकी रक्कम थकीत असून, हा वाद प्रलंबित आहे. याशिवाय सहकारमंत्री देशमुख यांच्या नावे २ कोटी २ लाख, पत्नीच्या नावे ४६ लाख ३४ हजार, मुलाच्या नावे ७ कोटी ६६ लाख ४८ हजार असे तिघांचे मिळून १४ कोटी ५२ लाखांचे कर्ज आहे.