जाणून घ्या; कोजागिरी पौर्णिमेचे काय आहे महत्त्व...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 03:06 PM2020-10-29T15:06:32+5:302020-10-29T15:06:38+5:30
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो.
कोजागरी पौर्णिमेचा उत्सव म्हणजे रात्री दुधात चंद्राचे प्रतिबिंब पाहून त्याचा नैवेद्य दाखवणे आणि मग ते दूध पिणे इतकेच आपल्याला माहित असते. पण त्याबाबतची इतर माहिती घेणेही आवश्यक आहे. हा सण अश्विन पौर्णिमेला साजरा करतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असतो त्यामुळे तो मोठा दिसतो. या रात्री लक्ष्मी पृथ्वीतलावर येऊन जागे असणाºयांना धनधान्य आणि समृद्धी प्रदान करते असे मानले जाते. चंद्र हा शीतल आणि आल्हाददायक गोष्टींचे प्रतिक असल्याने त्याची पूजा करणाºयांनाही चंद्रासारखी शीतलता मिळते असे मानले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ, म्हणजे कोजागरी पर्वतालगत आलेला असतो. त्यामुळे या पौर्णिमेला ‘कोजागरी पौर्णिमा’ म्हटले जाते.
या दिवशी नवान्न (नवीन पिकवलेल्या धान्याने) जेवण करतात. श्री लक्ष्मी आणि ऐरावतावर बसलेला इंद्र यांची रात्री पूजा करतात. पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी देव आणि पितर यांना समर्पित करुन नंतर नैवेद्य म्हणून ग्रहण करतात. हा प्रसाद आपल्याकडे आलेल्या सर्वांना देतात. शरद ऋतूतल्या पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवतात आणि नंतर नैवेद्य म्हणून ते दूध ग्रहण करतात. चंद्राच्या प्रकाशात एकप्रकारची शक्ती असते जी आरोग्यदायी असते असे म्हटले जाते. या रात्री जागरण करुन करमणुकीसाठी निरनिराळे बैठे खेळ खेळतात. दुसºया दिवशी सकाळी पूजेचे पारणे करतात.
लक्ष्मी आणि इंद्र या दोन देवतांना पृथ्वीवर तत्त्वरूपाने अवतरण्यासाठी चंद्र आग्रहात्मक आवाहन करतो. लक्ष्मी ही आल्हाददायक आणि इंद्र ही शीतलतादायक देवता आहे. यादिवशी वातावरणात या दोन देवता तत्त्वरूपाने येत असल्याने आणि त्यांचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असल्याने त्यांची पूजा केली जाते. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडलातून भूतलावर येते आणि जो जागा असेल, त्याच्यावर संतुष्ट होऊन त्याला कृपाशीर्वाद देऊन जाते. त्यामुळे कोजागरीच्या रात्री जागरण केले जाते.
- भाऊबली कंदले,
पंचागकर्ते, सोलापूर