जाणून घ्या; कोणत्या कारणामुळे पडणार दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2020 01:18 PM2020-08-20T13:18:34+5:302020-08-20T13:24:46+5:30
बैठकही झाली रद्द; इच्छुकांच्या डावपेचांमुळे श्रेष्ठीही धास्तावले
सोलापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदासाठी गुरुवारी अनगर (ता. मोहोळ) येथील लोकनेते कारखान्यावर श्रेष्ठींची बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. अध्यक्षपदाची निवड लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न संचालक करीत असले तरी इच्छुकांच्या डावपेचांमुळे खबरदारी घेतली जात आहे.
दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दिलीप माने, राजेंद्रसिंह राजेभोसले आणि दीपक माळी यांची नावे चर्चेत आहेत. संचालकांशी चर्चा करण्यासाठी लोकनेते कारखान्यावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला माजी आमदार गणपतराव देशमुख, दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार राजन पाटील आदी नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार होती.
सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. अध्यक्ष निवडीवरूनही संचालकात एकमत नाही. त्यामुळे अध्यक्ष निवड लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न श्रेष्ठी करीत आहेत. शुक्रवारी यासंदर्भात पत्र देण्याचा विचारही सुरू आहे. यादरम्यान, संघाच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक नेत्यांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. या इच्छुक संचालकाने अध्यक्षपदासाठी सूचक आणि अनुमोदकासह अर्ज भरल्यास सर्वांची पंचाईत होईल. श्रेष्ठींनी विशेष काळजी घ्यायची ठरवल्याचेही सांगण्यात आले.
सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनामुळे अनगर येथील बैठक रद्द केली आहे. परंतु, शुक्रवारी श्रेष्ठी नेते दूध संघात येतील. ही निवड लांबणीवर जावी, यासाठी प्रयत्न करतील. संचालकांचा कानोसाही त्याच दिवशी घेतला जाईल.
- राजन पाटील, माजी आमदार.