पराभवातून खूप काही शिकलो
By admin | Published: May 31, 2014 12:35 AM2014-05-31T00:35:45+5:302014-05-31T13:11:47+5:30
लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो.
सांगोला : लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य असून, पराभवातून आम्ही खूप काही शिकलो. निवडणुकीत यश-अपयश येतच असते, म्हणून निवडून आलेल्या सरकारने हुरळून जाऊ नये, असे सांगून आम्ही अपयश आले म्हणून खचून जाणार नाही. या निवडणुकीत जनतेने स्थैर्याच्या बाजूने कौल दिला. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी करून लढविणार असल्याचे सूतोवाच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले. खासगी दौर्यानिमित्त सांगोल्यात आले असता ते बोलत होते. काँग्रेस व आम्ही यापूर्वी १९७७ व १९९५ साली पराभव पाहिला आहे. १९७७ नंतर दोन वर्षांतच जनतेने परत आम्हाला संधी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसविरोधात जनतेने कौल देताना देशाच्या स्थैर्यासाठी भाजपाला साथ दिली. मात्र तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश व ओडिशा येथे मात्र जनतेने सक्षम पर्याय म्हणून राज्यातील घटक पक्षास मतदान केल्याचे निवडणुकीच्या निकालावरून दिसून आले. आगामी विधानसभेच्या निवडणुका एकत्रितच लढविणार असून कोणाला किती जागा याविषयी अद्याप निर्णय झाला नाही. देशात जनतेने स्थौर्याला संधी दिली आहे. एखादी विचारधारा किंंवा लाटेचा बारकाईने विचार करण्याची गरज आहे, असेही पवार म्हणाले. स्मृती इराणी अन् काँग्रेसला सल्ला लोकांचा आदर करणे, पराभवाची कारणेमीमांसा शोधून पुन्हा आत्मविश्वासाने कामाला लागणे गरजेचे आहे. नव्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या शैक्षणिक मुद्द्यावरुन काँग्रेसने विनाकारण वादात पडू नये. संबंधित मंत्र्याची अगोदर कामगिरी पहावी आणि मगच त्या विषयावर आपले मत प्रकट करावे, असे म्हणत पवारांनी काँग्रेसला सल्ला दिला. यावेळी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. भारत भालके, मंदिर समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे, आ. बबनराव शिंंदे, आ. दीपक साळुंखे, माजी आ. सुधाकरपंत परिचारक उपस्थित होते.
--------------------------------
मोदींचे कौतुक ४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १२ वर्षे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिल्याने त्यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे मला वाटत नाही की, देशाची सूत्रे हलविताना अडचण येणार आहे, असे म्हणत त्यांनी मोदींचे कौतुकच केले.