आपत्कालीन रस्ता सोडून स्टॉलची उभारणी, सोलापूर गड्डा यात्रेची तयारी सुरू, सिद्धेश्वर पंच कमिटीची सामंजस्याची भूमिका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:50 PM2017-12-25T12:50:39+5:302017-12-25T12:52:15+5:30
ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार देवस्थान पंचकमिटीने स्टॉलधारकांना आपत्कालीन रस्ता सोडूनच मंडप टाकण्यास सांगितले आहे.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २५ : ग्रामदैवत सिध्देश्वरांच्या यात्रेनिमित्त होम मैदानावर भरणाºया गड्डा यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार देवस्थान पंचकमिटीने स्टॉलधारकांना आपत्कालीन रस्ता सोडूनच मंडप टाकण्यास सांगितले आहे.
सिध्देश्वरांच्या महायात्रेत धार्मिक कार्यक्रमांबरोबरच होम मैदानावर भरणारी यात्रा आकर्षणाचा विषय असतो. होम मैदानावरही धार्मिक विधी होतात. पंचकट्टा ते मार्केट चौकी परिसरात मनोरंजनासाठी स्टॉल उभारले जातात. यात्रेच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती. तीत देवस्थान पंचकमिटीने स्टॉल उभारणीसाठी आपत्कालीन रस्त्यावर हक्क सांगितला होता. परंतु, जिल्हाधिकारी डॉ. भोसले, महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे आणि पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आपत्कालीन रस्ता सोडावाच लागेल, असे सांगितले होते. यादरम्यान रस्त्यासाठी न्यायालयीन लढाईही सुरू झाली. प्रशासकीय पातळीवर या गोष्टी सुरू असताना देवस्थान पंचकमिटीने सामंजस्याची भूमिका घेऊन स्टॉलधारकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूचा आपत्कालीन रस्ता सोडूनच स्टॉल उभारण्यास सांगितले आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून टोराटोरा, उंच पाळणे, डिज्ने लँड आदींसाठी कामे सुरू झाली आहेत.
----------------------------
जिल्हाधिकाºयांनी शांततेत प्रश्न मार्गी लावला
- मागील दोन वर्षांपूर्वी आपत्कालीन रस्त्यावरून बरेच वाद झाले होते. जिल्हाधिकारी एका बाजूला आणि पोलीस व महापालिका आयुक्त दुसºया बाजूला असे चित्रही दिसले होते. यंदाच्या आढावा बैठकीत पंचकमिटीच्या सदस्यांनी रस्त्याबाबत आग्रह केला होता. परंतु, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त हे तिघेही या मुद्यावर एकत्र असल्याचे दिसले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी हा विषय शांततेत मार्गी लागावा याची दक्षता घेतली. देवस्थान पंचकमिटीच्या सदस्यांना विश्वासात घेऊनच आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा करण्याची सूचना प्रातांधिकाºयांना केली. त्यामुळे देवस्थान कमिटीनेही सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. यंदाची यात्रा शांततेत होण्याचे संकेत आहेत.
------------------------
गेल्या वर्षीही आम्ही रस्ता सोडूनच स्टॉलची उभारणी केली होती. यंदाही त्याच पध्दतीने स्टॉल उभारण्यास सांगितले आहे. मागील काळात प्रशासनाने जाणूनबुजून आम्हाला त्रास दिला होता. जोपर्यंत न्यायालयाचा निकाल येणार नाही तोपर्यंत प्रशासन रस्त्यावर स्टॉल उभारू देणार नाही. प्रत्येक वेळी या मुद्यावरून वाद होतो. भक्तांना वेठीस धरणे मलाही आवडत नाही. यंदा प्रशासनाकडून अनेक गोष्टींमध्ये सहकार्य होत आहे.
- धर्मराज काडादी,
अध्यक्ष, सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटी.