पुण्याची नोकरी सोडून गावात आली अन् जिद्दीनं विकासासाठी मेंबर बनली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:44+5:302021-01-22T04:20:44+5:30
सोलापूर : गावाला यायला नीट रस्ता नाही की गावात गटार.. रस्ते अन् पिण्याचे पाणीही पुरेसे नाही. अनेक वर्षे ...
सोलापूर : गावाला यायला नीट रस्ता नाही की गावात गटार.. रस्ते अन् पिण्याचे पाणीही पुरेसे नाही. अनेक वर्षे एकनिष्ठ राहून प्रश्न मांडत राहिले मात्र दखल घेतली नाही... वाॅटर कपच्या चळवळीची मशाल हाती घेतल्यावरही दाद दिली नाही. म्हणून निवडणुकीत उतरण्याचं ठरवलं.. तर मतदार यादीतून नावच गायब. धडपड करुन मतदार यादीत नाव समावेश करुन घेतलं.. अपक्ष म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले स्वत:सह भावालाही कळमणकरांनी ग्रामपंचायत सदस्य केलं. ही संघर्षगाथा आहे कळमणच्या राधा क्षीरसागर या रागिणीची.
हे वास्तव आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण इथलं. सोलापूर- बार्शी रोडपासून गावडीदारफळ ते कळमण हा सहा किलोमीटर रस्ता अनेक वर्षांपासून अतिशय खराब झालेला..गावात पुरेसे पिण्याचे पाणी नाही, रस्ते व गटारीचे तर बोलायला नको. अनेक वर्षे हीच परिस्थिती मात्र बदल करण्यासाठी आग्रह धरुनही उपयोग झाला नाही. या व्यथा सोलापुरातील नामांकित शाळेत प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या दीपक क्षीरसागर व उच्च शिक्षण घेतलेल्या राधाने अनेक वेळा गावकऱ्यांसमोर मांडल्या. राधा ही बी.एस.सी. केमिस्ट्रीचे शिक्षण घेऊन पुण्यात नामांकित कंपनीत चांगल्या पगारावर काम करत होती. याशिवाय एम.पी.एस.सी. चा अभ्यासही करत होती. २०१८ मध्ये ती गावाकडे काही दिवसासाठी आली. अगदी पाण्याच्या टाकीशेजारी घर असूनही नळाला अर्धा घागरही पाणी येत नव्हते. तक्रार केली मात्र उपयोग झाला नसल्याने
राधाने थेट वाॅटर कपसाठी ट्रेनिंग घेतले व गावात पाणी चळवळ सुरू केली. गावकऱ्यांना सोबत घेण्यासाठी गाव कारभाऱ्याला प्रोजेक्टर व सहकार्य मागितले. मात्र नकारघंटा मिळाली. राधा थांबली नाही, शेजारच्या शेळगावच्या नीलेश गायकवाडची मदत घेत पाणी फाऊंडेशनचे काम सुरु केले. पाऊस चांगला पडल्याने त्याचे परिणामही चांगले दिसले.
राधा म्हणते.. ग्रामसभेत १३ प्रश्न उपस्थित केले पण एकाही प्रश्नाची ग्रामपंचायतीने नोंद घेतली नाही. ग्रामसभेची कागदपत्र मागितली तर हजर नसलेल्यांच्याही सह्या. प्रश्न
ओरडून सांगितले, रडले मात्र दाद दिली नाही. शिवाय उपस्थित केलेल्या एकाही प्रश्नाची दखल ग्रामपंचायतीने घेतली नाही.
लोकांच्या आग्रहाखातर ग्रामपंचायत निवडणूक लढवायचे ठरविले तर मतदार यादीत नावच नव्हते. पूर्वी अनेक वेळा मतदान केले असतानाही मतदार यादीत नाव नसल्याने आश्चर्य वाटले. म्हणून निवडणूक उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांना भेटून मतदार यादीत नाव सामावून घेतले.
अपक्ष म्हणून एकच अर्ज भरायचा होता मात्र दुसरे कोणी अर्ज भरण्यासाठीही सोबत आले नसल्याने माझा व राधाचा अर्ज दाखल केल्याचे राधाचा भाऊ प्रा. दीपक क्षीरसागर यांनी सांगितले.
- अनेक वर्षे गावावर राज्य करणारे सुनील पाटील व विरोधी गटाचे पंचायत समितीचे उपसभापती जितेंद्र शीलवंत यांनी एकत्र पॅनल केला. मात्र त्यांचे पाच तर नेतृत्व नसलेल्यांचे सहा सदस्य विजयी झाले.
चौकट
राधाच्या कामात सहभागी झालो: संपत पवार
पुण्यात चांगल्या पगारावर काम करणारी राधा गावात आली अन् पाणी फाऊंडेशनचे काम करु लागली. माझ्यासह अनेकांनी राधाला वेड्यात काढले मात्र तिचे चांगले काम पाहून मी ही सहभागी झालो असे विजय खेचून आणण्यात वाटा असलेल्या संपत पवार यांनी सांगितले. संजय लंबे व दीपक क्षीरसागर यांना घेऊन बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मी मांडला मात्र जुमानले नाही अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.
कोट
खूप काही अपेक्षा नाहीत, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक गावात नियमित यावेत व लोकांची कामे व्हावीत ही अपेक्षा आहे. नळाला पाणी नियमित यावे, गावडीदारफळ- कळमण रस्ता व्हावा, गावातील रस्ते, गटारीची कामे गुणवत्तेची व्हावीत हीच माफक अपेक्षा.
- राधा क्षीरसागर, नूतन ग्रामपंचायत सदस्य