परदेशातील संधी डावलून माऊलींच्या पालखी सोहळ्यातच रांगोळी काढून केली जात आहे सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 11:52 PM2019-07-08T23:52:22+5:302019-07-08T23:52:28+5:30
- अमोल अवचिते बेलापूर : माऊलींच्या सानिध्यात राहून मनाला शांती मिळते. रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होते. त्यातून जर ...
- अमोल अवचिते
बेलापूर : माऊलींच्या सानिध्यात राहून मनाला शांती मिळते. रांगोळी पाहिली की मन प्रसन्न होते. त्यातून जर एखादा सामाजिक संदेश दिला तर तो संदेश मनाला पटतो. आणि त्यातुन बदल घडू शकतो. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात आफ्रिकेतील मादागास्कर येथील आलेली संधी सोडून रांगोळी काढण्याची सेवा करत आहे. असे सांगत आहेत मंचरच्या असलेल्या प्रोफेशनल आर्टिस्ट जयश्री नितीन भागवत जुन्नरकर यांनी माऊलींप्रती भावना व्यक्त केली.
पालखी सोहळ्या दरम्यान आफ्रिकेत एका कार्यक्रमासाठी रंगोळी काढण्याची संधी मिळाली होती. मात्र ती संधी सोडून त्या माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. त्यांचे वडील निवृत्ती महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक वर्षांपासून रांगोळी काढत आहेत. कोणतेही रांगोळी काढण्याचे प्रशिक्षण घेतले नसून, वडिलांकडून त्यांना ही कला प्राप्त झाली आहे. रांगोळी कलेला माऊलींचा आशिर्वाद असल्याचे त्यांना वाटते.
सेवा म्हणून त्या रांगोळी काढतात. पालखी सोहळ्यात माऊलींच्या रथा पुढे विविध विषयांवर रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याची सेवा जयश्री करतात. यावर्षी 'स्वच्छ वारी स्वथ वारी', ' निर्मल वारी', 'मुलगी वाचवा' असे विविध विषयांवर संदेश दिला जात आहे.
एकूण पालखी मार्गवर ८० पोथी रांगोळी तर ४८५ किलो रंगांचा वापर केला जातो.
वारी समानता शिकवते
वारी हा विठ्ठलाचा एक महिमा आहे. जात, धर्म, पंत, स्त्री पुरुष भेदभाव पाळला जात नाही. वारी म्हणजे ऊर्जा आहे. जी सांगितीने वाढते. भजन, टाळ मृदंगाच्या गजराने मनुष्य एकरूप होतो. तरुणांनी एकदा तरी वारी अनुभवावी. वारी जीवनाचा योग्य मार्ग दाखवते. समृद्ध आणि परिपूर्ण होयचे असेल तर वारीत यावे असे आवाहन जयश्री यांनी केले आहे.