अन् जिल्हा आरोग्य अधिकारी झाले ग्रुपमधून लेफ्ट; आरोग्य मंत्र्याच्या दौऱ्यामुळे आरोग्य खात्याची जुळवाजुळव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 09:37 AM2020-06-27T09:37:02+5:302020-06-27T09:40:55+5:30
५० कर्मचारी अन् ५ पीपीई किट दिले; साहित्य खरेदीवरून सुरू आहे वाद
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे शनिवारी कोरोना उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावर असतानाच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार हे आरोग्य विभागाच्या ग्रुपमधून लेफ्ट (बाहेर पडल्यामुळे) जिल्हा परिषदेच्या वर्तुळात वेगवेगळी चर्चा रंगली आहे.
सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. सध्या २६६ पॉझिटिव्ह रुग्ण तर १४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३१ उपकेंद्र कार्यरत आहेत. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या केंद्रात काम करणारे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य व औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी साथीच्या नियंत्रणासाठी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटीचा निधी दिला. या निधीतून साहित्य खरेदीची प्रक्रिया लांबविण्यात आली. लोकप्रतिनिधीनी ओरड केल्यानंतर ४ जून रोजी मक्तेदार ठरवून वर्कऑर्डर देण्यात आल्या व त्यानंतर सर्व आरोग्य केंद्रांना साहित्य पोहोच केल्याचे जाहीर करण्यात आले. पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, आरोग्य केंद्रात कर्मचारी ५० आणि साहित्य पोहोचले पाच अशी परिस्थिती आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार हे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या दौर्याच्या तयारीसाठी त्यांनी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यानंतर आरोग्य विभागाच्या ग्रुपमधून ते लेफ्ट झाले. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत वेगवेगळी चर्चा रंगली आहे.