सोलापुरात विधानसभेची पूर्वतयारी; शेळके-चंदनशिवे यांच्यात गुप्तगू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:39 PM2019-06-14T19:39:07+5:302019-06-14T19:47:13+5:30
‘वंचित’चे नेते आंबेडकर यांची घेणार भेट; जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना आला वेग
सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणावरून नाराज झालेले काँग्रेसचे बाळासाहेब शेळके यांची वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी गुरुवारी दुपारी भेट घेऊन विधानसभेच्या पूर्वतयारीबाबत चर्चा केली.
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी शिफारस करूनही बाळासाहेब शेळके यांना सभापतीपदापासून वंचित ठेवण्यात आले. यामुळे ते कमालीचे संतप्त झाले आहेत. दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा निवडणुकीत आपली ताकद दाखविणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिल्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी त्यांच्याशी संपर्क केला. ठरल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी तीन वाजता चंदनशिवे यांनी जुळे सोलापुरातील जलारामनगरातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी सभापती भीमाशंकर जमादार, वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष विक्रांत गायकवाड, सुहास सावंत उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान चंदनशिवे यांनी मागील निवडणुकीचा इतिहास शेळके यांच्याकडून जाणून घेतला. आगामी निवडणुकीत वंचित आघाडीबरोबर आल्यास मताधिक्य वाढेल असा विश्वास चंदनशिवे यांनी व्यक्त केला. त्यावर शेळके यांनी लवकरच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन मते जाणून घेतली जातील. त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असे सांगितले. त्यावर चंदनशिवे यांनी १८ जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौºयावर येणार असल्याचे सांगितले. त्यांची भेट घेऊन आगामी विधानसभेची रणनीती ठरविण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. चर्चेतील अधिक तपशील सांगण्यास चंदनशिवे यांनी नकार दिला; मात्र सकारात्मक चर्चा झाली. गडबडीत निर्णय घेण्यापेक्षा सर्वांची मते जाणून घेण्याबाबत शेळके यांनी वेळ मागितल्याचे सांगितले.