व्याजाच्या पैशासाठी सावकाराकडून शिक्षकाला ठार मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:21 AM2021-03-22T04:21:13+5:302021-03-22T04:21:13+5:30
पाचेगांव बु. येथील भगवान सुखदेव कर्चे हे घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. २०११-१२ मध्ये आई पारुबाई ...
पाचेगांव बु. येथील भगवान सुखदेव कर्चे हे घोरपडी (ता. कवठेमहांकाळ) येथे शिक्षक म्हणून नोकरीस आहेत. २०११-१२ मध्ये आई पारुबाई यांना पॅरालीसिस झाल्याने औषधोपचारासाठी नातेवाईक कुबेर देवबा शिंदे यांच्या ओळखीने धर्मपुरी (ता. माळशिरस) येथील पोपट संभाजी कर्चे यांच्याकडून ३ टक्के व्याज दराने २ लाख घेतले. त्या बदल्यात ३ एकर जमीन १४ मार्च २०१३ रोजी पैसे परत देण्याच्या बोलीवर नावावर केली होती. दरम्यान भगवान कर्चे यांनी दरमहा ६ हजारांप्रमाणे दीड वर्षाचे १ लाख ८ हजार रुपये दिले. त्यानंतर आर्थिक अडचणीमुळे ते व्याज देऊ शकले नाहीत.
दरम्यानच्या काळात भगवान कर्चे हे पोपट कर्चे यांना जमीन नावावर परत द्या, असे म्हणाले असता त्याने शिवीगाळ, दमदाटी केली. त्यानंतर त्याने २ लाख रुपये मुद्दल, सहा वर्षाचे व्याज व चक्रवाढ व्याज दोन्ही मिळून २६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली.
पैसे न दिल्यास तुमची जमीन दुसऱ्याला विकण्याची धमकी देऊन परत जमीन मागितली तर जीवे ठार मारीन अशी धमकी देवून निघून गेले. याबाबत भगवान सुखदेव कर्चे यांनी खाजगी सावकार पोपट संभाजी कर्चे, उमेश पोपट कर्चे, सचिन पोपट कर्चे (रा. धर्मपुरी, ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.