पटवर्धन कुरोली परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्यांचा वावर; दोन शेळ्या केल्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 10:46 AM2020-09-19T10:46:24+5:302020-09-19T10:46:54+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पटवर्धन कुरोली : पटवर्धन कुरोली (ता. पंढरपुर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आहे. या प्राण्याने पट-कुरोली येथील शेतकरी विजय मोरे यांची शेळी व शेवते येथील शेतकरी चंद्रकांत तोंडले यांचे बोकड फस्त केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
बिबट्या सदृश्य प्राण्याला मागील दोन दिवसापूर्वी शनी मंदिर परिसरात संजय मगर यांच्या शेतात काही नागरिकांनि पाहिले होते. त्याच परिसरात वास्तव्य करणाऱ्या विजय मोरे यांच्या शेतातील वस्तीवरील शेळी या परण्याने फस्त केली शिवाय दुसऱ्या दिवशी शेवते (ता. पंढरपुर) येथील शेतकरी चंद्रकांत तोंडले यांच्या वस्तीवर बोकड या प्राण्याने ओढत आणून शेजारील डाळिंबाच्या बागेत आणून अर्धवट अवस्थेत खाऊन टाकल्याचे आढळले. त्यामुळे शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शनी मंदिर परिसरात या प्राण्याला काही शेतकऱ्यांनी स्वत: पाहिल्याचे सांगितले. काहींनी याचे फोटो, व्हिडिओ ही शूट केले आहेत. हा प्राणी बिबट्याच आसल्याचे प्रतक्ष दर्शीचे म्हणणे असून याचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशी मागणी शेतकरी, नागरिक करीत आहेत.