रमाळा शहरात बिबट्याची एण्ट्री; शहरवासीयांत घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:17 AM2020-12-09T04:17:25+5:302020-12-09T04:17:25+5:30
गेल्या आठ दिवसांपासून करमाळा तालुक्यातील विविध भागात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने सोमवारी तालुक्यातील तिसरा बळी घेऊन सर्वत्र दहशत निर्माण केली ...
गेल्या आठ दिवसांपासून करमाळा तालुक्यातील विविध भागात धुमाकूळ घातलेल्या बिबट्याने सोमवारी तालुक्यातील तिसरा बळी घेऊन सर्वत्र दहशत निर्माण केली आहे. तालुक्यात विविध ठिकाणी बिबट्या असल्याचे नागरिक सांगत आहेत. हे सर्व सुरू असताना सोमवारी रात्री करमाळा शहरातच बिबट्याने एण्ट्री केली. येथील जामखेड रस्त्यावर मार्केट कमिटीच्या जागेत वजन काट्याशेजारी प्रकाश भीमराव पवार यांच्या दुकानाशेजारीच त्यांनी आपली जनावरे बांधलेली होती. यातील एका लहान रेडकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले आहे. आसपास दिसत असलेल्या ठश्यांवरून हा हल्ला बिबट्यानेच केला असण्याची शक्यता स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.
आतापर्यंत बिबट्याचा वावर ग्रामीण भागामध्ये होता. परंतु सोमवारी रात्रीचा प्रकार हा करमाळा शहरातच घडला असल्याने शहरावासीय घाबरले आहेत. या आधीही करमाळा बायपासजवळील जाधव वस्ती, सावंत वस्ती, लावंड वस्ती आदी ठिकाणी बिबट्या दिसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु सोमवारच्या प्रकारामुळे हा बिबट्याच आहे असे म्हटले जात आहे. करमाळा शहराच्या आजूबाजूला बऱ्याच भागात उसाचे क्षेत्र असल्याने या ठिकाणी बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा नागरिकांतून होत आहे. तसेच काल पोथरे येथे एका शेतकऱ्याच्या तीन शेळ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत.
सध्या करमाळा शहराजवळ बिबट्या आल्याने वनविभागाने तालुक्यात किती बिबटे आले आहेत त्याची माहिती देऊन त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
फोटो ओळी ०८करमाळा-बिबट्या०१
: करमाळा शहरातील जामखेड रोडवरील प्रकाश पवार यांच्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून ठार केले.