बिबट्याचा मोर्चा आता पश्चिम भागात; उंदरगावात दिसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:52+5:302020-12-17T04:46:52+5:30
उंदरगाव येथे बुधवारी सकाळी सरपंच हनुमंत नाळे यांना बिबट्या दिसला. त्यानंतर वनविभागाला कळविल्यानंतर वन अधिकारी तत्काळ हजर झाले व ...
उंदरगाव येथे बुधवारी सकाळी सरपंच हनुमंत नाळे यांना बिबट्या दिसला. त्यानंतर वनविभागाला कळविल्यानंतर वन अधिकारी तत्काळ हजर झाले व तपास सुरू केला. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार व त्यांना पाहिजे त्या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे. परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने बिबट्याला लपणे सोपे जात आहे. दुपारनंतर उंदरगाव येथे डॉग स्कॉड व शार्प शूटर दाखल झाले. सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी बिबट्या झाला होता जेरबंद
उंदरगाव येथे २०१८मध्ये बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले होते. त्या वेळीही वनविभागाने बिबट्या नाहीच, हा तरस आहे, असे ठामपणे सांगितले होते. परंतु खरोखरच बिबट्या पिंजऱ्यात बंद झाल्यानंतर वनविभागाने गप्प राहणे पसंत केले होते. तालुक्यातील फुंदेवाडी, अंजनडोह, चिखलठाण व आता उंदरगाव असा या नरभक्षक बिबट्याने प्रवास केला आहे. वनविभागापुढे आता बिबट्याला पकडण्याचे आव्हान आहे.
------
कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका
तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या त्रासामुळे येथील लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा. नागरिकांना कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा शिवप्रताप युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शंभुराजे फरतडे यांनी प्रशासनाला दिला आहे. अकलूज आणि बारामती तालुक्यातील शूटर नेमल्यानेही वेगळाच गोंधळ सध्या करमाळा तालुक्यात निर्माण झाला आहे. यापुढे बिबट्याचा बंदोबस्त होण्याअगोदर निष्पाप बळी गेल्यास वनविभाग व प्रशासनाच्या विरोधात तालुक्यातील नागरिकांसह मोर्चा काढला जाईल, असे म्हटले आहे.